मुंबई : मेट्रो ३चे कारशेड आरे जंगलात करण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात रविवारी  आरेतील पिकनिक पॉइंट येथे  पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले.  कोणत्याही परिस्थितीत आरेत  कारशेड होऊ देणार नाही, असा निर्धार पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी ११ वाजता झालेल्या निदर्शनांत पर्यावरणप्रेमी, आरेवासीय आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सदस्यांसह राजकीय पक्षाचे नेते-कार्यकर्तेही सहभागी झाले होते. आमचा विकासाला विरोध नाही; पण पर्यावरणाचा ऱ्हास करून, त्यातही शहरातील एकमेव जंगल नष्ट करून विकास होणार असेल, तर असा विकास आम्हाला नको. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरेत कारशेड होऊ देणार नाही, असा निर्धार  आरेप्रेमींनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरे कारशेडविषयी आग्रही आहेत. आरेत लवकरच कामाला कशी सुरुवात करता येईल, यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता आम्ही आरे वाचविण्यासाठी रणनीती ठरवत आहोत. फडणवीस आरेबाबत सातत्याने खोटी, फसवी विधाने करीत आहेत. ही विधाने कशी खोटी आहेत हे लवकरच आम्ही मुंबईकरांसमोर मांडू, अशी माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली.

दर रविवारी आंदोलन

रविवारपासून आरे वाचवा आंदोलनाला पुन्हा सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी  उत्स्फूर्तपणे आणि मोठय़ा संख्येने मुंबईकर रस्त्यावर उतरले. यापुढे दर रविवारी आरेत आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी माहिती ‘सेव्ह आरे’कडून देण्यात आली.

आरेतही झाडी, डोंगर..

गुवाहाटीत जाऊन झाडी, डोंगर पाहणाऱ्यांना मुंबईतील, आरेतील झाडी आणि डोंगराचा राग का? असा सवाल या वेळी आरेतील रहिवासी प्रकाश भोईर यांनी केला. तसेच कारशेड आणि इतर कोणताही प्रकल्प आरेत येऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आदित्य ठाकरे यांचा पाठिंबा

रविवारच्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले होते. त्यानुसार आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार होते. मात्र विधानसभेत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी हजर राहावे लागल्याने आंदोलनात सहभागी होता येत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी कळवले आणि आरेत कारशेड उभारण्याविरोधातील आंदोलनाला आंदोलनाला आपला पाठिंबा दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environmentalists protest new maharashtra govt decision to shift metro car shed to aarey zws
First published on: 04-07-2022 at 03:38 IST