दप्तरदिरंगाईचा फटका बसलेल्या विजेत्यांकडून नाराजी

कोणतीही स्पर्धा म्हटली की, विजेत्यांना उत्सुकता असते, ती बक्षिसाची. मात्र माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना तीन महिने उलटूनही अद्याप प्रशस्तिपत्र मिळाले नसल्याने विजेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर स्पर्धेचे पहिले वर्ष असल्याने दिरंगाई झाली असल्याची कबुली अधिकारी देत आहेत.

डॉ. कलाम यांच्या ८४व्या जयंतीनिमित्त शासनाकडून ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार १५ ऑक्टोबरला राज्यातील अनेक शिक्षण संस्था आणि संघटनांकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या कलाम यांच्या विचारांनी अनेकांकडून स्फूर्तिदायी लेखन व्हावे, यासाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली. यासाठी ‘राज्य मराठी विकास संस्थे’कडून संयोजक नेमण्यात आले. सरकारी दप्तरदिरंगाईमुळे विजेत्यांना प्रशस्तिपत्रक मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. देशाला आदर्श असणाऱ्या डॉ. कलाम यांच्या नावाने स्पर्धा भरवणे आणि विजेत्यांकडे दुर्लक्ष करणे, ही गंभीर बाब आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि विजेत्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात यावी, असे मत विजेत्यांनी नोंदविले.

गेल्या वर्षी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेसाठी ‘राज्य मराठी विकास संस्थे’कडून संयोजक नेमण्यात आले होते. यात अनेक पारितोषिके होती आणि स्पर्धेचे पहिले वर्ष असल्याने दिरंगाई झाली. मात्र, लवकरच स्पर्धेकांना प्रशस्तिपत्रक देण्यात येतील.

– आनंद काटीकर, प्रभारी संचालक, राज्य मराठी विकास संस्था