तज्ज्ञांचे मत

मुंबई : भारतात उपलब्ध असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांच्या वर्धक मात्रेबाबत संशोधनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे, परंतु या अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर होण्याची वाट न पाहता आरोग्य, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर लशींची वर्धक मात्रा देणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

करोना लशीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना लस दिली गेली. या वर्गाला लस देऊन आता जवळपास वर्ष होत आले असल्यामुळे यांना वर्धक मात्रा देणे गरजेचे आहे, असे मत संशोधकांसह अनेक स्तरावर व्यक्त केले जात आहे. परंतु कोणत्या लशीची वर्धक मात्रा द्यावी याबाबत अनेक मतमतांतरे सध्या समोर येत आहेत.

भारतात उपलब्ध असलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड यांच्या वर्धक मात्रेबाबत सध्या संशोधनात्मक अभ्यास जाहीर झालेला नाही. त्यामुळे याबाबतचा अभ्यास होणे गरजेचे आहे. असा अभ्यास उपलब्ध असल्यास तो जाहीर होणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय करोना कृती दलातील सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले. पाश्चात्त्य देशांमध्ये वर्धक मात्रेबाबत अभ्यास झाला असून याचे निष्कर्षही जाहीर झाले आहेत. आपल्याकडे वर्धक मात्रेबाबत अभ्यास झाला नसल्यास असा संशोधनात्मक अभ्यास केंद्रीय आरोग्य विभागाने करायला हवा. परंतु या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार आहे. ओमायक्रॉन घातक नसला तरी वेगाने पसरणारा विषाणूचा प्रकार आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर जोखमीच्या गटांना तरी लगेचच वर्धक मात्रा द्यायला हवी, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

वर्धक मात्रा ही दोन विविध प्रकारच्या लशींची दिल्यास अधिक फायदेशीर असल्याचे पाश्चात्त्य देशांमधील अभ्यासांमधून निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपल्याकडेही कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनची आणि कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना कोव्हिशिल्डची वर्धक मात्रा देता येईल का याचा विचारही होणे गरजेचे आहे. वर्धक मात्रांबाबतचे आपल्याकडील अभ्यास जाहीर होण्यास बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाश्चात्त्य देशांमधील लशींच्या निष्कर्षांचा अभ्यास करून सध्या काही जोखमीच्या गटांना वर्धक मात्रा सुरू करणे आवश्यक आहे, असे मत लोकमान्य टिळक रुग्णालयातील माजी सूक्ष्मजीवशास्त्रतज्ज्ञ डॉ. सुजाता बावेजा यांनी व्यक्त केले.

‘सरसकट वर्धक मात्रेसाठी घाई नको!’

सध्या मोठ्या लोकसंख्येला लशीची पहिली मात्रा प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सरसकट वर्धक मात्रेबाबत मागणी करणे निश्चितच रास्त नाही. संशोधनात्मक अभ्यास समोर आल्यानंतरच याबाबत विचार केला जावा, असे साथरोगतज्ज्ञ डॉ. टी. सुंदरामन यांनी स्पष्ट केले.