इस्थर अनुह्य़ा हत्या प्रकरणात कुर्ला रेल्वे पोलिसांना इस्थरचे लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रीकरण गवसले आहे. त्यात ती एका इसमासोबत चालत असून मोबाइलवरही बोलताना दिसत आहे. हा इसम कोण आणि ती कुणाच्या मोबाइलवरून कोणाशी बोलतेय याचे गूढ निर्माण झाले आहे.
इस्थर ५ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात उतरली होती. कुर्ला रेल्वे पोलिसांना तिचे फलाट क्रमांक ४ आणि ५वरील सीसीटीव्ही चित्रीकरण सापडले आहे. यात ती फलाट क्रमांक ४ वर एकटी जाताना दिसत आहे. काही वेळातच ती फलाट क्रमांक ५ मधून बाहेर पडताना दिसत आहे. या ठिकाणी जुने प्रतीक्षालय असून तेथे ती केवळ वळसा घालून आली आहे. या वेळी तिच्यासोबत फ्रेंच कट दाढी राखलेला, पांढरा टी शर्ट व निळ्या जीन्समधला ३५ ते ४० वयाचा मधील इसम चालताना दिसत आहे. तो तिच्या ओळखीचा असावा कारण त्याने इस्थरच्या सामानाची ट्रॉली हातात घेतली आहे, तर इस्थर त्या वेळी मोबाइलवर बोलत असताना दिसत आहे. इस्थरचा जो मोबाइल पोलिसांना सापडला त्याच्या सीडीआरमध्ये त्या वेळी एकही फोन आल्याची किंवा केल्याची नोंद नव्हती. त्यामुळे तो मोबाइल या इसमाचा असावा, अशी शक्यता आहे. आम्ही या इसमाचे फोटो काढून सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना पाठवले, पण कुणीही त्याला ओळखले नाही. त्यामुळे तो स्थानिक टॅक्सी किंवा रिक्षाचालक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्थरच्या कुटुंबीयांनीही त्याला ओळखले नाही. त्याच्या शोधासाठी कुर्ला रेल्वे पोलिसांचे एक पथक शुक्रवारी हैदराबाद येथे रवाना झाले आहे, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी दिली.
इस्थरवर बलात्कार नाही?
न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील सूत्रांनुसार इस्थरवर बलात्कार झालेला नाही. तिच्या शरीरावर जखमा असल्या तरी त्या बलात्कार झाल्याचे दर्शवत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
एक संशयित ताब्यात
इस्थरवर बलात्कार झाला नसल्याचे उघड झाल्याने बलात्काराच्या उद्देशाने तिची हत्या झाली नसल्याचा तर्क पुढे आला आहे. सीसीटीव्हीत तिच्यासोबत आढळलेल्या इसमावर आता पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
अनुह्य़ा प्रकरणाला कलाटणी ; सीसीटीव्हीमध्ये गूढ इसम दिसला
इस्थर अनुह्य़ा हत्या प्रकरणात कुर्ला रेल्वे पोलिसांना इस्थरचे लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रीकरण गवसले आहे.
First published on: 01-02-2014 at 04:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Esther anuhya murder case police suspect man spotted in cctv footage