इस्थर अनुह्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी चंद्रभान सानप याच्यावर बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने केवळ बलात्काराचा प्रयत्न केल्याचे सांगितले असले तरी इस्थरच्या शरीरावर जखमा आढळल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात अधिकाअधिक पुरावे जमविण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
इस्थरवर निर्जन स्थळी चोरीच्या उद्देशाने नेले तरी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. चंद्रभान सानप याची कसून चौकशी सुरू आहे.
न्यायवैद्यक चाचणीच्या अहवालात इस्थरच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी सानपवर अपहरण आणि बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र इस्थरचा मृतदेह कुजलेला असल्याने बलात्कार सिद्ध करणे कठीण आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
 मोटारसायकलीवरून इस्थरला नेल्याचा दावा सानपने केला आहे. मात्र हा दावा पोलिसांच्याही पचनी पडत नाही. परंतु या दोघांना मोटारसायकलीवरून जाताना पाहणारे दोन साक्षीदार पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी जप्त केलेली मोटारसायकल पंचनाम्यात दाखवली आहे.
इस्थरचा लॅपटॉप टिटवाळा आणि शहाड रेल्वे स्थानकादरम्यानच्या खाडीत टाकल्याने सानपने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पाणबुडे आणून हा लॅपटॉप शोधण्याचा प्रयत्न केला. सानप सांगत असलेल्या सगळ्या गोष्टी पोलीस तपासून बघत असून अधिकाअधिक पुरावे जमविण्याचा प्रयत्न सुरू आहे.