पाश्चात्त्य वाद्यांच्या सुरावटी, संकल्पनांचा ऊहापोह

सुरावटींना विलग करणाऱ्या अनेक निकषांची माहिती चित्रफितींच्या माध्यामातून दिली.

‘सूर पश्चिमेचे’ कार्यक्रमात दिपप्रज्वलन करताना पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, विश्वास मोकाशी, अजय अंबेकर, संगीततज्ज्ञ डॉ. चैतन्य कुंटे.

‘लोकसत्ता संपादक शिफारस’ योजनेत निवडलेल्या ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’वर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण

मुंबई : पाश्चात्त्य लोकसंगीत आणि कलासंगीतासाठी वापरण्यात येणाऱ्या वाद्यांच्या सुरावटी आणि संकल्पनांचा ऊहापोह शनिवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात पार पडलेल्या ‘सूर पश्चिमेचे’ या कार्यक्रमात करण्यात आला. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ योजनेत निवडलेल्या ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या डॉ. अशोक रानडे लिखित ग्रंथावर आधारित ‘सूर पश्चिमेचे’ या कार्यक्रमाचे सादरीकरण पुस्तकाचे संपादन करणारे संगीततज्ज्ञ डॉ. चैतन्य कुंटे यांनी केले. श्रोत्यांना आणि कानसेनांना यानिमित्ताने पाश्चिमात्य संगीतातील स्वर-सप्तक, श्रेणीव्यवस्था आणि लयताल या संकल्पनांना समजून घेता आले.

चित्रपट संगीताच्या माध्यमातून जगभरातील संगीत कानी पडते, पण पाश्चात्त्य संगीतातली विविध शैली आणि मूळ संकल्पनांची माहिती असतेच असे नाही. पाश्चिमात्य संगीताबद्दल  भारतात असलेले  हे अज्ञान लक्षात घेता पॉप्युलर प्रकाशन, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेला ‘सूर पश्चिमेचे’ हा कार्यक्रम शनिवारी पार पडला. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. या वेळी पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर उपस्थित होते.

डॉ. अशोक रानडे यांनी आपल्या ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या ग्रंथात मांडलेल्या पाश्चात्त्य संगीतशैलींमधील स्वर-सप्तक, मेलडी-हार्मनी, सिम्फनी, सोनाटा, जॅझ, मोनोफॉनिक आणि पॉलीफॉनिक या संज्ञांचे वाचन त्यांचे शिष्य डॉ. चैतन्य कुंटे यांनी केले. वाचनाबरोबरच प्रत्येक संगीतशैलीची आणि संकल्पनेची चित्रफीत दृक्श्राव्य पद्धतीने कुंटे यांनी उलगडून दाखविल्याने श्रोत्यांना या गोष्टी समजणे सोपे झाले. संकल्पनांसोबत प्रत्येक संगीतशैलीसाठी वापरली जाणारी वाद्ये, त्यांचा इतिहास, महत्त्व, त्यातील सुरावटींची उत्त्पती याची ओळखही कुंटे यांनी श्रोत्यांना करून दिली.

जगभरच्या संगीतशैलींचा अभ्यास केल्यावरच आपल्या मातीत रुजलेल्या संगीताची थोरवी आणि त्यातील न्यूनतेची जाणीव होते, असे आपले गुरू नेहमी सांगत, अशी आठवण कुंटे यांनी सांगितली. पाश्चिमात्य संगीतात लोकवाद्यांची सुरावट ही कलासंगीतासारखी (शास्त्रीय संगीत) वाटत असली तरी त्यांतील सुरावटींना विलग करणाऱ्या अनेक निकषांची माहिती चित्रफितींच्या माध्यामातून दिली. शिवाय पाश्चात्त्य संगीतामध्ये वाद्यातून निर्माण होणाऱ्या श्राव्यापेक्षा वादकाच्या दुश्यपरिणामालासुद्धा महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी वादकाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरशासमोर बसून काही महिने रियाज करावा लागतो, अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच एकाच स्वर-सप्तकात वेगवेगळ्या सुरावटींची निर्मिती होत असल्याने पाश्चात्त्य संगीत भारदस्त जाणवत असल्याचे कुंटे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Event held based on book paschatya sangeet sandhya kosh

ताज्या बातम्या