विक्रोळीत मित्राच्या फ्लॅटवर नेऊन विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी २५ वर्षीय इव्हेंट ऑर्गनायझरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अंधेरी पश्चिमेला वर्सोवा येथील म्हाडा वसाहतीत राहतो. विक्रोळी पार्कसाइट पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पीडित महिला विवाहित आहे. पण नवऱ्याबरोबर मतभेद असल्यामुळे ती आई-वडिलांच्या घरी राहते. शनिवारी पीडित महिलेची आरोपीबरोबर भेट झाली. त्यानंतर आरोपी तिला मुंबईत वेगवेगळया ठिकाणी घेऊन गेला. अखेरीस लोअर परेलला ते एका पबमध्ये गेले. तिथे अन्य मित्र-मैत्रिणी त्यांना भेटले.
रात्री एकच्या सुमारास सर्वजण विक्रोळी गोदरेज कॉलनीमधील मित्राच्या फ्लॅटवर गेले. पार्टी सुरु असताना आरोपी महिलेला बाथरुममध्ये घेऊन गेला व तिथे तिच्यावर बलात्कार केला. महिलेने कुठे वाच्यता करु नये यासाठी आरोपीने तिला धमकावले व मारहाण सुद्धा केली.
