मुंबई: राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) गेली अनेक वर्षे तोटयात आहे. हे जगजाहिर आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आत्ताच श्वेतपत्रिका प्रसिध्द करण्यामागे एक कारण आहे. सरनाईक यांचा राज्यात असलेल्या एसटी मालकीच्या जागांवर ‘डोळा’ आहे. एसटीचे ‘भले’ होईल की नाही माहित नाही पण या पुर्नविकासात सरनाईक यांचे चांगभलं होणार आहे, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते व माजी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली.

एसटी महामंडळाची सद्य आर्थिक स्थिती मांडणी करण्यासाठी सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे श्वेतपत्रिक जाहीर केली. महामंडळाची आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी संभाव्य उपाययोजनांची रुपरेषा या श्वेतपत्रिकेत दिली आहे. एसटी महामंडळाच्या एकूण ४५ आर्थिक वर्षात ३७ वर्षे एसटी तोटयात असल्याचे सांगण्यात आले. राज्यात एसटी बस स्थानकांची संख्या ५९८ आहे.

याशिवाय मोक्याच्या कार्यशाळा, आगार, या महामंडळाच्या मालकी जागांवर खासगी व सार्वजनिक भागिदारी (पीपीपी) तसेच बांधा वापरा हस्तांतरण करा (बीओटी) तत्वावर पुर्नविकास करण्यात यावा, असा एसटीचा प्रस्ताव आहे. एकूण १३६० हेक्टर जागांचा विकास केल्याशिवाय एसटीचे भवितव्य अंधारात असल्याचे पटवून दिले जात आहे. त्यावर विरोधकांनी टीका केली आहे.

प्रताप सरनाईक हे व्यवसायाने एक विकासक (बिल्डर) आहेत. मोक्याच्या जागांचे महत्व त्यांना इतरांपेक्षा जास्त कळते. त्यांचा डोळा परिवहन मंत्री झाल्यापासून एसटी महामंडळ मालकीच्या जागांवर आहे. यातील मोक्याच्या जागा ते आपल्या बिल्डर मित्रांना फूंकून टाकणार आहेत. यात त्यांच्यासह त्यांच्या बिल्डर मित्रांचे उखळ पांढरे करण्याचा डाव आहे. त्यासाठी श्वेतपत्रिकेची पार्श्वभूमी तयार करण्यात आली आहे. या श्वेतपत्रिकाचे पंचनामा आम्ही येत्या अधिवेशनात करणार आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीओटी तत्वावर एसटीच्या मोक्याच्या जागांचा पुर्नविकास करताना प्रथम दर्शनी भाग हा खासगी विकासकांना देण्यात आला. मागील बाजू एसटीला दिल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या जागांच्या विकासामुळे एसटीचे किती भले होईल हे माहित नाही पण या तथाकथित विकासात सरनाईक यांचे चांगभलं होणार आहे, असा घणाघात परब यांनी सरनाईक यांच्या श्वेतपत्रिकेवर केला आहे.