कुटुंबीयांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

विक्रोळी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खरे (३०) यांच्या अकस्मात मृत्यूला वरिष्ठ अधिकाऱ्याचा जाच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. खरे यांच्या पत्नी व अन्य नातेवाईकांनी शनिवारी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेत तब्बल पाऊण तास विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या छळाचा पाढा वाचला. तसेच या प्रकरणी मोरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्याखेरीज खरे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर आयुक्तांनी समजूत काढल्यानंतर खरे यांच्या मृतदेहावर संध्याकाळी सातारा येथील खंडाळा, पारगाव येथे अंत्यसंस्कार पार पडले.

गडचिरोलीतील अडीच वर्षे उल्लेखनीय सेवेबद्दल खरे यांना उत्कृष्ट कार्य पुरस्कार बहाल करून तत्कालीन अधीक्षक सुवेझ हक यांनी कौतुक केले होते. त्यानंतर दोन वर्षे कोल्हापूर येथे कर्तव्य बजावल्यानंतर खरे यांची यावर्षी मुंबईत, विक्रोळी पोलीस ठाण्यात बढतीवर बदली करण्यात आली होती. मात्र इतक्या तरुण वयात साहाय्यक निरीक्षक झालेल्या खरे यांच्याबद्दल पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना आकस होता. त्यात वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे यांनी छळसत्र सुरू केले होते, अशी माहिती खरे यांचे मेव्हणे वैभव पवार यांनी लोकसत्ताला दिली.

आठ महिन्यांपासून तणावाखाली

कोणताही गुन्हा घडला की तपासाला वाव, वेळ न देता आरोपी पकडण्यासाठी मोरे यांचा खरेंवर सततचा दबाव असे. त्यातून सततचा अपमान, टोमणे, पोलीस ठाण्यातून काढण्याची, वार्षिक मूल्यांकन अहवाल (एसीआर रिपोर्ट) खराब करण्याची धमकी यामुळे खरे गेल्या आठ महिन्यांपासून तणावाखाली होते. पोलीस ठाण्यात सुरू असलेला मानसिक छळ त्यांनी आपल्या पत्नीला व अन्य नातेवाईकांना सांगितला होता.