मराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक म्हणजे अभिजात कलाकृती. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू आजही पहायला मिळते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच, शिवाय मराठी मध्येही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे पुनः पुन्हा लोकांसमोर सादर केले गेले. ‘सखाराम बाइंडर’ हे रंगभूमीवरचं एक वादळी पर्व आता पुन्हा रंगमंचावर गाजणार आहे.
स्त्री-पुरुष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे, विख्यात नाटटकार विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असून विशेष म्हणजे तितक्याच ताकदीचे अभिनेते सयाजी शिंदे या नाटकातील सखाराम ही भूमिका करणार आहेत. सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे येथे या नाटकाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. ‘सुमुख चित्र’ आणि ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’च्या सहकार्याने हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे. या निर्मिती संस्थेचं हे तिसरं नाट्यपुष्प आहे.
‘हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे’ असं सांगत, रसिकांना पुन: प्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची भावना सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवली. आजच्या पिढीने हे नाटक पाहिलेले नाही. या पिढीलाही हे नाटक या निमित्ताने जाणून घेता येणार आहे. या नाटकाच्या नव्या संचाबद्दल बोलताना दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव सांगतात, ‘एक अभिजात कलाकृती पुन्हा रसिकांसमोर सादर करणे आमच्यासाठी एक जबाबदारीच आहे. तेंडुलकरांच्या लेखनाला कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन नव्या संचात हे नाटक करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आजच्या पिढीला विजय तेंडुलकर यांची श्रेष्ठता समजावी यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे’.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्याबरोबर नेहा जोशी, चरण जाधव,अनुष्का बोऱ्हाडे, अभिजीत झुंजारराव हे कलाकार या नाटकात आहेत. या नाटकाचे निर्माते मनोहर जगताप तर कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. नेपथ्य सुमीत पाटील तर प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. रंगभूषा शरद सावंत तर वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे. सहाय्यक संकेत गुरव आहेत.