काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका; राज्यपालांची भेट

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा-बारा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी, राज्यात अजून सरकार स्थापन होत नाही, त्यामुळे अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कुणी वाली उरला नाही, अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. त्यांच्या टीकेचा रोख भाजपवर होता. राज्यपालांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या नेत्यांनी केली.

राज्यात अवकाळी पावसामुळे कापूस, भात, सोयाबिन, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भुईमूग, धान, कांदा, कडधान्ये त्याचबरोबर बागायती पिके, फळबागा, फुलशेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.  परतीचा पाऊस लांबल्याने व तसेच अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या पिकांचीही हानी झाली आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले बँक कर्ज वाया गेले आहे. सध्याचे सरकार, शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष देत नाही. राज्यपालांनी हस्तक्षेप करून, शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सरकार का स्थापन होत नाही?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून, दहा-बारा दिवस उलटून गेले तरी अजून सरकार का स्थापन होत नाही, असा सवाल अजित पवार यांनी केला. भाजप-शिवसेनेचे काय चालले आहे कळत नाही, अशी टिप्पणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सरकार स्थापन करण्यास विलंब होत आहे, त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायाला कुणी वाली उरलेला नाही, असे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.