मुंबई : जयपूर एक्स्प्रेसमध्ये दरोडा प्रकरणात हरियाणातील कुख्यात फासी टोळीचा सहभाग असल्याचे आढळून आले असून याप्रकरणी रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने हरियाणा येथून एका आरोपीला अटक केली आहे. या टोळीतील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. मागील आठवड्यात जोगेश्वरीत राहणारे बांधकाम व्यावसायिक आयुब खान (३६) हे पत्नी हिना (३०) आणि दोन लहान मुलांसह वांद्रे जयपूर एक्स्प्रेस या गाडीतून मुंबईत येत होते. बोरीवलीनंतर ट्रेनची गती कमी झाल्यावर ४ अनोळखी इसमांनी खान दांपत्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सामान लुटण्याचा प्रयत्न केला होता.
खान दांपत्यांनी या आरोपींना विरोध करून जोरदार प्रतिकार केला होता. हिना यांनी एका इसमाला पकडण्याचा प्रयत्न केला. आयुब खान यांनीही दुसऱ्या आरोपीशी दोन हात केले. मात्र त्या दोघांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. हे चौघे जण गोरेगाव ते जोगेश्वरी स्थानकादरम्यान उडी मारून पळून गेले. मात्र तोपर्यंत त्यांनी खान दांपत्याकडे असलेली एक ट्र्रॉली बॅग पळवून नेली होती. त्या बॅगेत एकूण ७ लाखांचे दागिने आणि रोख रक्कम होती. या प्रकरणी बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात कलम ३०९ (४) आणि ३(५) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटण्याच्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तयार केली होती.
गुटख्याचे पाकिट, तुटलेल्या चष्मा
रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. घटनास्थळावर पोलिसांना गुटख्याचे एक पाकिट आणि तुटलेला चष्मा आढळला होता. पाकिटावरील अक्षरे गुजराथी भाषेतील होती. त्या आधारे पोलिसांनी सुरत येथे तपास केला. सीसीटीव्हीच्या आधारे देखील आरोपींचा माग काढण्यात आला. त्या लुटीमागे हरियाणातील कुख्यात फासी टोळीतील चोरांचा सहभाग असल्याचे आढळले. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या आरोपीला बुधवारी बोरीवली येथील न्यायालयात हजर करण्यात आले. आम्ही या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या टोळीचील उर्वरित आरोपींना देखील लवकर अटक केली जाईल, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी सांगितले.