भाजपमधील बुजुर्गांना यापुढे आशीर्वादापुरते मानाचे स्थान देऊन पक्षाच्या कारभाराची सारी सूत्रे नव्या पिढीच्या नेतृत्वाकडे सोपविण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपच्या मातृसंस्थेची प्रदीर्घ काळापासूनची इच्छा अडवाणी यांच्या राजीनाम्यामुळे पूर्ण झाले आहे, अशी चर्चा अडवाणी यांच्या नाराज समर्थकांमध्ये सुरू आहे.
भाजपच्या अंतर्गत कारभारात आपण लक्ष घालत नाही, असे एकीकडे म्हणतच, भाजपने काय केले पाहिजे आणि काय करू नये यावर कानपिचक्या देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खूप जुनी इच्छा अडवाणी यांच्या राजीनाम्यामुळे अखेर पूर्ण झाली आहे. संघाच्या परंपरावादी चौकटीतून पक्षाला बाहेर काढून सुधारणावादी चेहरा देणारे अटलबिहारी वाजपेयी आणि महंमद अली जीना यांची स्तुती करणारे लालकृष्ण अडवाणी यांनी बाजूला व्हावे आणि नवनेतृत्वाला संधी द्यावी ही इच्छा तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांच्या स्पष्ट इशाऱ्यातूनच पूर्वीच उघड झाली होती. लोकसभेत विरोधी पक्षनेते असताना अडवाणी यांनी पाकिस्तान भेटीत ४ जून २००५ रोजी महंमद अली जीना यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यानंतर संघाचा चरफडाट झाला, मात्र जिना यांच्याविषयीच्या वक्तव्यावर अडवाणी नंतरही ठाम राहिल्याने, ते संघाच्या काळ्या यादीत गेले. सुदर्शन यांचा तो सूर पुढे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांतूनही उमटत होता. नंतरच्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर अडवाणी यांना थेट बाजूला न करता त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडावे अशी व्यूहनीती करण्यात आली. जानेवारी २०१० मध्ये अडवाणी यांच्या जागी जागी सुषमा स्वराज यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. याच दरम्यान पक्षाचे नेतृत्वही नितीन गडकरी यांच्याकडे आले आणि पक्षात नवनेतृत्वाचा जमाना सुरू करण्याच्या संघाच्या इच्छेची फळे दिसू लागली. गडकरी यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीवरदेखील अडवाणी फारसे समाधानी नव्हते, पण गडकरींना संघाचा भक्कम पाठिंबा होता. या काळात अडवाणी यांना पक्षाचे पितृतुल्य असे स्थान दिले गेले तरी हा काळ त्यांच्या राजकीय वाटचालीतील सर्वाधिक असमाधानाचाच होता. त्यांची खंत अनेकदा त्यांच्या वक्तव्यांतून आणि लेखनातूनही व्यक्त होत राहिली, परंतु संघाची जबर पकड असलेल्या भाजपच्या नवनेतृत्वाने अडवाणी यांची व्यथा फारशी मनावर घेतली नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नितीन गडकरींना पक्षाध्यक्षपद सोडावे लागले, पण त्यांच्या जागी राजनाथ सिंह यांची निवड करण्यासही अडवाणी फारसे उत्सुक नव्हतेच. पण राजनाथ सिंह यांच्या निवडीतही संघ नेतृत्वाचा पडद्याआडचा हात असल्याने अडवाणी यांच्या नाराजीचा सूर पक्षात प्रभावीपणे उमटलाच नाही. आगामी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांची प्रचार प्रमुखपदी निवड करण्याबाबतही अडवाणी यांनी पुन्हा विरोध दर्शविल्याने संघाने या वेळी निर्णायक भूमिका घेऊन अडवाणी यांना कठोरपणे बाजूला केले, असे भाजपमधील एक गट मानतो.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
अखेर संघाची इच्छापूर्ती!
भाजपमधील बुजुर्गांना यापुढे आशीर्वादापुरते मानाचे स्थान देऊन पक्षाच्या कारभाराची सारी सूत्रे नव्या पिढीच्या नेतृत्वाकडे सोपविण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपच्या मातृसंस्थेची प्रदीर्घ काळापासूनची इच्छा अडवाणी यांच्या राजीनाम्यामुळे पूर्ण झाले आहे, अशी चर्चा अडवाणी यांच्या नाराज समर्थकांमध्ये सुरू आहे.
First published on: 11-06-2013 at 04:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally rss wish fulfilled after advani resignation