मुखपट्टय़ा न लावणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल करण्याच्या नियमांर्तगत गेल्या तीन दिवसांत पालिकेने ६८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे अंधेरी पूर्व, मालाड, कांदिवली, दहिसर, बोरिवली, मुलंड या भागांतूनच दंडवसुली झाली आहे. अतिसंक्रमित असलेल्या या भागातच मुखपट्टय़ा लावण्याच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घराबाहेर पडताना तोंडावर मुखपट्टी लावण्याचे बंधन न पाळणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत पालिकेने ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे, तर ३१३ लोकांना समज देऊन सोडून देण्यात आले.

घरातून बाहेर पडताना तोंडावर मुखपट्टय़ा लावूनच बाहेर पडा, असे आवाहन सरकारी यंत्रणांनी केलेले असताना अनेक जण मुखपट्टी लावत नसल्याचे चित्र आहे, तर अनेक जण मुखपट्टी बाजूला करून बोलत असतात. मुखपट्टी बाजूला करून थुंकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, तसेच खासगी वाहनांमधून प्रवास करतानाही मुखपट्टी वापरणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने निर्गमित केले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

याअंतर्गत ३० जून रोजी ३५ लोकांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर १ जुलै रोजी १६ जणांकडून १६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर ३१३ लोकांना समज देऊन सोडण्यात आले.

या तीन दिवसांत सर्वाधिक दंडवसुली कांदिवलीतून ३५ हजार इतकी झाली, तर त्यापाठोपाठ अंधेरी पूर्वमधून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर अंधेरी पूर्वमधून १०५ लोकांना, तर  मुलुंडमध्ये ८३ लोकांना समज देऊन सोडण्यात आले. बोरिवली, दहिसर, कांदिवली, मुलुंडमध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना याच भागांत मोठय़ा संख्येने लोक मुखपट्टय़ा न लावता वावरत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fine of rs 68000 in three days for not wearing a mask abn
First published on: 08-07-2020 at 00:17 IST