मुंबई : महाराष्ट्र विधान भवनाच्या प्रवेश द्वारावरील तपासणी कक्षात सोमवारी दुपारी तीन वाजता अचानक आग लागली. विद्युत बिघाडामुळे (शॉर्ट सर्किट) ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग काही मिनिटात विझली असली तरी विधानभवनाच्या सुरक्षा यंत्रणेविषयी आणि विद्युत यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दक्षिण मुंबईत नरिमन पॉईंट परिसरात विधान भवनात प्रवेशद्वाराजवळच्या तपासणी कक्षात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. आग मुख्यतः विद्युत वाहिन्या, स्विचबोर्ड आणि अन्य विद्युत उपकरणांना लागली होती. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत अवघ्या सहा मिनिटांत म्हणजेच तीन वाजून सहा मिनिटांनी आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही.