मुंबईनजीकच्या समुद्रात पूर्वेला असणाऱ्या बूचर बेटावरील तेलटाक्यांना शुक्रवारी संध्याकाळी लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही. तब्बल १५ तासांचा कालावधी उलटून गेला तरीही अग्निशमन दलाचे जवान अजूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास या ठिकाणी असणाऱ्या तेलाच्या मुख्य टाकीला आग लागली होती. त्यानंतर ही आग पसरत गेली. एलिफंटा बेट आणि नजीकच्या समुद्रात असणाऱ्या बोटींतून ही आग स्पष्टपणे दिसत होती. काल दुपारी मुंबईत बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्याचवेळी बूचर बेटावर वीज पडून तेलाच्या टाकीला आग लागली असावी, असा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त करण्यात आला. ही आग भीषण असल्यामुळे समुद्रात दूरवर आगीचे लोळ आणि धूर पाहायला मिळत होता. त्यानंतर अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, काल रात्रभर ही आग धुमसतच होती. अखेर आज सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मुख्य तेलाच्या टाकीपर्यंत पोहचण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजूनही येथील आग पूर्णपणे विझलेली नाही. या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बूचर बेट हे जवाहर द्वीप या नावानेही ओळखले जाते. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येत असलेल्या या बेटावर दहा ते पंधरा लाख लिटर तेलाचे साठे करणाऱ्या टाक्या आहेत. मोठ्या तेलवाहू जहाजांमधून डिझेल किंवा पेट्रोल येथे उतरवून ते भूमिगत वाहिन्यांद्वारे माहुलमधील तेलशुद्धीकरण कारखान्यांकडे पाठविले जाते. हा संपूर्ण परिसर ज्वालामुखीसारखा असून येथे एखादी ठिणगी पडली, तरी संपूर्ण मुंबईवर त्याचे सावट पडू शकते. घारापुरी बेटे व उरणचे मोरा बंदर यांच्यापासून हे बेट अगदी जवळ आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास शहराला धोका उत्त्पन्न होऊ नये म्हणून मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या या बेटावर खनिज तेल साठवले जाते. हा संपूर्ण परिसर दाट झाडीने व्यापला असून येथे एक लहानशी टेकडीही आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire breaks out at oil depot on butcher island near mumbai
First published on: 07-10-2017 at 08:06 IST