आग विझवताना जिवाची बाजी लावणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्याला जाहीर झालेले राष्ट्रपतीपदक त्याच्या हाती पडण्यास तब्बल १४ वर्षे जावी लागली. या अधिकाऱ्याला १९९९ मधील आगीच्या घटनेसाठी जाहीर झालेले राष्ट्रपतीपदक अखेर काही दिवसांपूर्वी देण्यात आले.
भेंडी बाजाराजवळील मुसाफिरखाना मार्ग चारवरील, फातिमा मंझिलमध्ये ४ नोव्हेंबर १९९९ रोजी मोठी आग लागली होती. त्यावेळी हाती असलेली साधने व जवान यांना साहाय्याने अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी मोठय़ा शौर्याने आग विझवली होती. त्यांचे धैर्य, नेतृत्व, व्यावसायिक कौशल्य आणि कर्तव्याप्रती समर्पण भावना लक्षात घेऊन २००१ मध्ये त्यांना अग्निशमन सेवेसाठी राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर करण्यात आले. राष्ट्रपती पदके राज्यपालांमार्फत पदकविजेत्यांना सन्मानपूर्वक दिली जातात. मात्र त्यावेळी रहांगदळे यांचे पदक राज्यपाल भवनापर्यंत पोहोचूच शकले नाही. दिल्ली – मंत्रालय- राजभवन या प्रवासात ते गहाळ झाले होते. त्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून प्रयत्न सुरू झाले. तक्रारी, सूचना यानंतरही या पदकाचा शोध लागला नाही. तोवर उपमुख्य अधिकारी पदापर्यंत बढती मिळूनही या राष्ट्रीय पुरस्काराची उणीव रहांगदळे यांच्याइतकीच त्यांच्या सहकाऱ्यांनाही सलत होती. अखेरीस शासकीय यंत्रणांच्या गतीने २०१४ मध्ये रहांगदळे यांच्यासाठी पुन्हा पदक पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या सप्ताह सांगता दिनाचे औचित्त्य साधून आयुक्त सीताराम कुंटे यांच्या हस्ते रहांगदळे यांना बहाल करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘राष्ट्रपतीपदका’चा चौदा वर्षांचा वनवास संपला
आग विझवताना जिवाची बाजी लावणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्याला जाहीर झालेले राष्ट्रपतीपदक त्याच्या हाती पडण्यास तब्बल १४ वर्षे जावी लागली.
First published on: 30-04-2014 at 04:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire brigade officer honoured with bravery award