scorecardresearch

Mumbai Fire Brigade Recruitment : राज्य सरकारचा पाठ्यक्रम पूर्ण करणारे अग्निशामक ‘एका’ अटीमुळे नोकरीस मुकणार

या अटीमुळे राज्य अग्निशमन सेवा अकादमीचा पाठ्यक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुंबई अग्निशमन दलातील नोकरीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Mumbai Fire Brigade Recruitment : राज्य सरकारचा पाठ्यक्रम पूर्ण करणारे अग्निशामक ‘एका’ अटीमुळे नोकरीस मुकणार
( संग्रहित छायचित्र )

प्रसाद रावकर

मुंबई : राज्य अग्निशमन सेवा अकादमीच्या पाठ्यक्रमासाठी किमान उंची १६५ सेमी असलेल्या उमेदवारांना प्रवेश देण्यात येत आहे. मात्र असे असताना मुंबई अग्निशमन दलाने मात्र अग्निशामकांची ९१० पदे भरण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत १६५ सेमीऐवजी १७२ सेमी किमान उंचीची अट घातली आहे. परिणामी, या अटीमुळे राज्य अग्निशमन सेवा अकादमीचा पाठ्यक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुंबई अग्निशमन दलातील नोकरीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांमध्ये याबाबत प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला असून काही उमेदवारांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी, मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामकांची मेगाभरती वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या काही दशकांत मुंबईचा दहिसर आणि मुलुंडपर्यंत विस्तार झाला. त्यानंतर मुंबई आणि पूर्व-पश्चिम उपनगरांमध्ये पुनर्विकासाचे वारे वाहू लागले असून चाळी, तसेच चार-पाच मजली इमारतींच्या जागी बहुमजली इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दलासमोरील आव्हाने वाढू लागली आहेत.

हेही वाचा >>> ‘मार्ड’चा संप अखेर मागे; मागण्या मान्य करण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

मुंबईमधील अरूंद रस्ते, वर्दळीचे विभाग, वाहतूक कोंडी आदींमुळे बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाला नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बहुमजली इमारतींमध्ये आग लागल्यानंतर बचावकार्य करताना अग्निशामकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर अपुऱ्या मनुष्यबळामुळे अग्निशमन दलावरील कामाचा ताण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलामध्ये ९१० अग्निशामकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आहे. गेल्या आठवड्यात त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणुकीसाठी योगी आदित्यनाथ आजपासून मुंबईत

तब्बल सात वर्षांनी अग्निशमन दलामध्ये अग्निशामकांची भरती करण्यात येत आहे. अग्निशमन दलात २०११ पूर्वी झालेल्या अग्निशामक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराची किमान उंची १६५ सेमी असावी अशी अट घालण्यात आली होती. मात्र २०११ मध्ये अचानक अग्निशामक पदासाठी घालण्यात आलेल्या अटीमध्ये किमान उंची ७ सेमीने वाढवून १७२ सेमी करण्यात आली. उंचीच्या अटीत अचानक करण्यात आलेल्या बदलामुळे राज्य अग्निशमन सेवा अकादमीचा पाठ्यक्रम पूर्ण करणाऱ्या अग्निशामकांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र जानेवारी २०२३ मध्ये करण्यात येत असलेल्या अग्निशामकांच्या भरतीमध्ये ही अट कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राज्य अग्निशमन सेवा अकादमीचा पाठ्यक्रम पूर्ण करणारे अग्निशामक मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीतून बाद ठरण्याची चिन्हे आहेत.

इतकेच नव्हे तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या अग्निशमन सेवेमध्येही अग्निशामकांच्या उंचीची आर्हता १६५ सेमी असावी असे स्पष्ट म्हटले आहे. मात्र असे असतानाही अग्निशमन दलाने या अटीत केलेल्या बदलांमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई अग्निशमन दलातील किमान १६५ सेमी उंचीच्या अग्निशामकांमुळे अग्निशमन मोहिमेत अडचणी वा अडथळा येत असल्याचा कोणताही अहवाल मुंबई महानगरपालिकेला सादर केलेला नाही. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाने कोणत्या निकषाद्वारे ही अट बदलली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अग्निशामकांच्या भरती प्रक्रियेत उंचीची अट बदलताना नगर विकास खाते अथवा राज्य अग्निशमन संचालनालयाला कळवून अथवा लेखी परवानगी घेऊन उंचीच्या अटीमध्ये बदल करणे क्रमप्राप्त आहे. दरम्यान, अग्निशामक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली आहे. त्यामुळे आता अटी-शर्तींमध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत, असे अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

अग्निशामक पदाच्या वयाच्या अटीमध्ये बदल करून मुंबई अग्निशमन दलाने राज्य अग्निशमन सेवा अकादमीचा पाठ्यक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आवश्यकता भासल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल.

– कविता सांगरुळकर, संचालिका, अभय अभियान ट्रस्ट

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 10:23 IST

संबंधित बातम्या