पठ्ठे बापूरावांनी मुंबईच्या लावणीत या शहराला रावणाच्या लंकेची उपमा दिली आहे. ती अर्थातच या महानगरीच्या वैभवाचा चहुमुलखी जो डंका वाजत होता त्यामुळेच; पण वेगळ्या संदर्भातही ही उपमा मुंबईला लागू होते. हनुमानाने लंकेची जी अवस्था केली होती, तशीच वेळ मुंबईवरही आली होती. १८०२ मध्ये मुंबईदहन होता होता राहिले. असे म्हणतात, की सतत दहा दिवस तेव्हा मुंबई जळत होती. सर्व मुंबई शहरात मोठा हाहाकार माजला होता. आग विझल्यानंतरही ती पुढचे सहा महिने धुमसत होती, असे सांगतात.

ही आग लागली ती किल्ल्यात, बाजारगेटजवळ. तेथे वाणी, भाटय़े, पारशी, बोहरी यांची वस्ती होती. तिचे वर्णन एका तत्कालीन कवितेत येते. कवी म्हणतो-

कडकडीत दुपारी चेतला अग्नि भारी।। मदनदहनिं जैसा कोपला त्रिपुरारी।।

उघडुनि नयनरागें तिसरा शंकराने।। रतिपति क्षणमात्रें जाळिला निकरानें।।

पुढे कवीने या आगीने केलेल्या हानीचे वर्णन केले आहे-

किती हत्या झाल्या कितिक जीवते प्राणि जळले।।

पशूपक्षीयाती बहुत अगनी माजि भुजले।।

कितीका वस्तूंचा जळत सुटला माल खजिना।।

हिरे रत्नें मोतीं जळति वरव्या दिव्य रचना।।

ही आग विझविण्यासाठी कोणी डंकनसाहेब धावून आला होता –

आला साहेब डंकन झडकरीं हाकार ऐकोनियां।।

धांवे दुखनि अग्नि दुर्धर स्वयें पाण्येंचि विजवावया।।

‘मुंबईचे वर्णन’कार माडगावकर लिहितात- ‘या श्लोकांत मुंबईचा अर्धा भाग जळला असें म्हटले आहे तें ठीकच आहे. त्या वेळी किल्ल्यापासून मुंबादेवीपर्यंत जमिनीस मुंबई असी संज्ञा होती.’

महानगरांना बहुधा आगीचा शाप असावा. ब्रिटिश मुंबईप्रमाणेच ब्रिटिशांच्या लंडनमध्येही अशीच आग लागली होती. १६६६ मध्ये सलग तीन दिवस ते मध्ययुगीन शहर जळत होते. तेरा हजारांहून अधिक घरे त्यात खाक झाली. अनेक चर्च जळाली. त्यात जीवितहानी किती झाली त्याचा तर पत्ताच नाही. ही आग एका बेकरीतून भडकली होती, असे सांगण्यात येते. मुंबईची ही आग कशी लागली त्याचा शोध लागू शकला नाही; परंतु एका कहाणीनुसार ‘एक बाई तिसऱ्या मजल्यावर वडे तळीत बसली होती. तिच्या कढईत पाणी पडल्यामुळें एकाएकीं आगीचा भडका होऊन घराचें छप्पर पेटलें.’

या आगीत सर जमशेटजी जिजीभाई यांच्या मालाची आणि द्रव्याची बरीच नासाडी झाली. माडगावकार लिहितात – ‘यावरून अडाणी कुणबी लोकांत एक पोरकट म्हण आहे, तिचें स्मरण होतें. घर जळाल्यानें संपत्ति वाढती आणि वाघानें खाल्यानें राज्यप्राप्ति होती.’

अशीच दुसरी आग लागली ती १८२२ मध्ये. ‘कोटांतील मोठय़ा देवळाच्या मागें कापसाचे गठ्ठे रचले होते  त्यांस आग लागली, तीमुळेंही मुंबईस बराच धक्का लागला.’

या दोन्ही आगींमुळे मुंबईचे किती नुकसान झाले असावे? माडगावकर सांगतात – ‘सुमारे एक कोट रुपयांवर धक्का बसला.’

यानंतरची मोठी आग म्हणजे गोदीतील.

हा झाला इतिहास. मुंबईच्या आगीचे वर्तमान म्हणजे – मंत्रालयातील अग्नितांडव. यंदाच्या जूनमध्ये त्या दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत..