आपापसातील वादातून तिघांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना बुधवारी रात्री साकीनाका येथे घडली. या गोळीबारात कुणी जखमी झाले नसून साकीनाका पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. साकीनाक्यात राहणारे मजनू याजव, फज्जू यादव आणि शाहिद कुरेशी यांच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल होता. हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. औरंगजेब सिद्दीकी या या प्रकरणातला साक्षीदार होता. त्याने न्यायालयात साक्ष देऊ नये यासाठी या तिघांनी त्याच्यावर दबाव आणला होता. महिन्याभरापूर्वी त्यांच्यात वादही झाला होता. अखेर या प्रकरणात समेट घडवून आणण्यासाठी आरोपींनी साक्षीदार सिद्दीकी आणि तक्रारदार मुजाहिद खान यांना बुधवारी रात्री खैरानी चाळीजवळील आर्दश शाळेजवळ भेटण्यासाठी बोलावले. त्यात त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी एका आरोपीने आपल्याजवळील गावठी कट्टा बाहेर काढला. त्यामुळे दोघे जण जवळच्या चाळीत जाऊन लपले. तेव्हा आरोपींनी हवेत गोळीबार केला. त्यांनी एकूण तीन राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. मात्र त्यात कुणी जखमी झाले नाही.