मुंबई : चेन्नईची ‘द प्रेस इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ आणि नवी दिल्लीची ‘द इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस’ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांत ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाचे छायाचित्रकार दीपक जोशी यांच्या छायाचित्राला प्रथम तर जयपाल सिंग यांच्या छायाचित्राला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील पत्रकार तबस्सुम बरनांगरवाला यांनाही ‘उत्कृष्ट बातमी’करिता तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी ऑनलाइन माध्यमातून करण्यात आले.

‘सुपरहिरोज.. बॅटिलग अ‍ॅट द फ्रंटलाइन इन द टाइम ऑफ क्रायसिस’ असा १५ व्या पुरस्कार सोहळय़ाचा विषय होता. हात आणि पाय नसलेली एक शिक्षिका करोनाच्या काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी आपल्या व्यंगत्वावर मात करत विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतानाचे छायाचित्र दीपक जोशी यांनी काढले होते. जयपाल सिंग यांनी ऑनलाइन अभ्यास मिळवण्यासाठी नेटवर्कच्या शोधात झाडावर बसलेल्या विद्यार्थ्यांचे हरयाणातील छायाचित्र टिपले होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्रात छापून आलेल्या ‘अ‍ॅझ सप्टेंबर कोविड १९ सर्ज स्वीप्स रुरल महाराष्ट्र, हण्ट फॉर बेड्स’ या बातमीसाठी तबस्सुम बरनांगरवाला यांना पुरस्कार देण्यात आला.

‘उत्कृष्ट बातमी’ या श्रेणीतील प्रथम पुरस्कार ‘द न्यूज मिनिट’च्या वृत्त संपादक अ‍ॅना इसाक यांना, द्वितीय पुरस्कार ‘द हिंदू बिझनेस लाइन’च्या साहाय्यक संपादक श्रिया मोहन यांना देण्यात आला. उत्कृष्ट छायाचित्रणासाठीचा द्वितीय पुरस्कार ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’चे शशांक परदे यांना देण्यात आला.