लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने खवय्यांसाठी माहीम चौपाटीवर सुरू केलेल्या सी फूड प्लाझाला मुंबईकरांची पसंती मिळत आहे. या सी फूड प्लाझाला भेट देणाऱ्यांची संख्या प्रत्येक आठवड्यागणिक वाढत असून आतापर्यंत ३० हजार पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. समुद्राच्या सान्निध्यात अस्सल कोळी पद्धतीचे जेवण, कोळी संस्कृतीचा आस्वाद घेता येईल अशा या सी फूड प्लाझामुळे पर्यटकांनाही माहीम चौपाटीचे आकर्षण वाटू लागले आहे.
मुंबईतील कोळीवाड्याच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यानुसार मुंबईतील कोळीवाड्यांचे स्वरूप जपून सुशोभिकरण करण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. कोळीवाड्याच्या ठिकाणी पर्यटकांना अस्सल मांसाहारी पदार्थ मिळावेत व कोळी महिलांना रोजगार मिळावा या दृष्टीकोनातून सी फूड प्लाझा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातील पहिला सी फूड प्लाझा माहीम कोळीवाडा येथे सुरू झाला असून गेल्या काही दिवसांपासून या सी फूड प्लाझाला पर्यटकांची पसंती मिळत आहे. त्याचबरोबर महिला बचतगटही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
आणखी वाचा-गोवंडीमधील झोपडपट्टीला भीषण आग; सुदैवाने कोणीही जखमी नाही
मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने दीपक केसरकर यांनी महिला बचतगटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ संकल्पना राबविण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. त्यानुसार मुंबईतील माहीममध्ये पहिला ‘सी फूड प्लाझा’ सुरू झाला आहे. या ठिकाणी दर्जेदार अन्नपदार्थ पुरवतानाच व्यवसायासाठी पूरक अशी साधनसामुग्री पुरविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने प्रत्येक महिला बचतगटाला साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे.
माहीम चौपाटी लगत कोळीवाड्यात असलेल्या या सी फूड प्लाझाला प्रत्येक आठवड्याला सरासरी ५०० जण भेट देत आहेत. २ नोव्हेंबर २०२३ रोजी उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत ३० हजार पर्यटकांनी सदर सी फूड प्लाझाला भेट दिली आहे.
आणखी वाचा-वांद्रे रेक्लेमेशनमधील २९ एकर जागेचा विकास अदानी समूह करणार; अदानीची सर्वाधिक बोली
या ‘सी फूड प्लाझा’साठी आवश्यक दालन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आले आहे. त्यासोबतच पाच टेबल, २० खुर्च्या, विद्युत रोशणाई, ओला आणि सुका कचरा संकलन डबे, ग्राहकांना जेवण पुरवणाऱ्या महिलांना ॲप्रन, हातमोजे, डोक्यावर टोपी आदी बाबी पुरविण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक महिला बचत गटाने दालनावर त्यांचे माहिती फलक लावले आहेत. नोंदणीकृत कोळी महिला बचत गटांना ‘सी फूड प्लाझा’मध्ये दालन उभारणी आणि संचलनाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना सेवा पुरवताना स्वच्छतेबाबत आणि पदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, याची खातरजमा करण्याच्या सूचना देखील महिला बचत गटांना प्रशासनाने दिल्या आहेत. या सर्व गोष्टींचा फायदा महिला बचत गटांना दैनंदिन व्यवसायात होत असून राहत्या ठिकाणीच रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे, असे संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले.
नजीकच्या काळात याठिकाणी अधिकाधिक सुविधा देतानाच कायमस्वरूपी प्रसाधनगृह आणि पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली आहे.