मुंबई सेंट्रल ते वरळी स्थानकापर्यंतच्या पल्ल्यातील पहिले भुयारीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मार्गिका असलेल्या मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचा २५ वा टप्पा बुधवारी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पूर्ण झाला. मुंबई सेंट्रल ते वरळी स्थानक या तिसऱ्या पॅकेजमधील हा पहिलाच टप्पा असून, एकूण मेट्रो मार्गिकेपैकी ७८ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

मेट्रो ३ ची मार्गिका एकूण सात पॅकेजमध्ये विभागली असून मुंबई सेंट्रल ते वरळी स्थानक हे सर्वाधिक लांबीचे पॅकेज आहे. या पॅकेज अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझिअम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचा समावेश आहे. या पॅकेजमधील हे पहिलेच भुयारीकरण आहे. पॅकेज तीनच्या भुयारीकरणासाठी ‘तानसा १’ हे भुयार खोदणारे यंत्र (टीबीएम) वापरण्यात आले आहे. सायन्स म्युझिअमच्या उत्तरेस २७ सप्टेंबर २०१८ रोजी हे ‘टीबीएम’ उतरवण्यात आले होते. तब्बल ४९० दिवसांनी ते बुधवारी वरळी स्थानकापर्यंत २०७३ मीटर भुयारीकरण पूर्ण करून बाहेर आले. या भुयारीकरणासाठी १३८१ सेगमेन्ट रिंग्जचा वापर करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी वरळीचे आमदार आणि मंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. ‘मेट्रो ३ चे काम ऐतिहासिक असून या प्रकल्पावर काम करणाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी येथे आलो आहे. मेट्रो ३ चे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे आदित्य यांनी यावेळी सांगितले.

‘प्रकल्पाच्या आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याचे आव्हानात्मक काम अभियंत्यांच्या व तज्ज्ञांच्या पथकाने अगदी सुलभरीत्या पूर्ण केले,’ अशा शब्दांत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी समाधान व्यक्त केले. आत्तापर्यंत उपनगरीय रेल्वेद्वारे न जोडली गेलेली मुख्य व्यापारी केंद्रे ‘पॅकेज तीन’द्वारे जोडली जाणार असल्याचे ते म्हणाले.

आता सात टप्पे शिल्लक

आतापर्यंत भुयारीकरणाचे २५ टप्पे पूर्ण झाले असून या वर्षांत उर्वरित ७ टप्पे पूर्ण होणे अपेक्षित आहे. भुयारीकरणासाठी सध्या १७ टीबीएम कार्यरत आहेत. ही यंत्रे उतरवण्यासाठी मार्गिकेवर  आठ ठिकाणी मोठी विवरे (लाँचिंग शाफ्ट) खोदण्यात आले आहेत. संपूर्णपणे जमिनीखालून धावणाऱ्या ‘मेट्रो ३’च्या ५६ किमी मार्गिकेवर  २७ थांबे असतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First subdivision of the bridge from mumbai central to worli station akp
First published on: 30-01-2020 at 01:26 IST