विविध मत्स्य जातींची माहिती देणारे आगळवेगळे ‘अॅक्वेरियम अॅण्ड फिश शो’ हे प्रदर्शन मुलुंडमध्ये १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान भरविण्यात येणार आहे.
मुलुंडच्या केळकर महाविद्यालय मार्गावरील मराठा मंदिर सभागृहात हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले राहील. लौकिक क्रिएशन्स आणि अभिजित चव्हाण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्य आणि पाळीव प्राण्यांच्या बाबतीत असलेल्या कुतूहलाचे आणि शंकांचे योग्य निरसन व्हावे ही त्या मागील भूमिका आहे.
या प्रदर्शनात १००च्या आसपास मत्स्यपेटय़ा आणि सुमारे २०० जातींचे मासे मांडण्यात येणार आहेत. यात मत्स्यालय प्रदर्शन आणि सजावट यावर अधिक भर दिला जाणार आहे. अॅरोवाना, अॅरोप्रीयामा, ब्लॅक घोस्ट, रीड स्नेक, अॅलीगेटर गार, स्टिंग रे, व्हीमल, मार्स फिश, स्टार फिश आदी विविध दुर्मीळ जातींचे मासे पाहता येतील. मत्स्यप्रेमींना विशेष स्वयंसेवकांकडून दुर्मीळ आणि विदेशी माशांबद्दल माहिती दिली जाणार आहे. या प्रदर्शनाठीचे प्रवेश मूल्य ५० रुपये इतके आहे.