मुंबई : अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. ही तुळई रेल्वे भागावर २५ मीटरपर्यंत सरकवण्यात आली आहे. हे काम बुधवारी मध्यरात्री करण्यात आले. महाकाय अशी ही तुळई संपूर्ण रेल्वेमार्गावर बसवण्यासाठी एकूण ८६ मीटर सरकविणे आवश्यक असून ती २५ मीटरपर्यंत सरकविण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर उर्वरित अंतरावर ही तुळई सरकवण्यात येणार आहे. अंधेरी पूर्व - पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर आता दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर १५ महिन्यांनी एक बाजू सुरू होऊ शकली. एप्रिलच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास सुरुवात झाली होती. दुसऱ्या तुळईचे सुटे भाग येण्यास उशीर झाला. त्यामुळे पालिकेचे नियोजनही कोलमडले होते. दुसरी बाजू सुरू करण्याची मुदतही पुढे ढकलावी लागली होती. मात्र आता या तुळईचे सर्व भाग जोडणीचे काम पूर्ण झाले असून ही तुळई रेल्वेमार्गावर बसवण्यास तयार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ही तुळई रेल्वे मार्गावर सरकवण्याची तयारी केली असून ही तुळई बुधवारी रात्री रेल्वेमार्ग परिसरात २५ मीटरपर्यंत सरकवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याकरीता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या पूल विभागाने पश्चिम रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली. हेही वाचा - डेटिंग ॲप फसवणूकप्रकरणी सहा जणांना अटक, सर्व आरोपी नवी दिल्लीतील रहिवासी गोखले पुलासाठी तुळई स्थापित करण्याचे काम पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्वेच्या निर्देशानुसार मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाअंतर्गत सुरू आहे. रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासून, त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक व वीजपुरवठा या दोन्ही घटकांमध्ये खंड (ब्लॉक) मिळाल्यानंतर तुळई स्थापनेचे काम केले जाते. मात्र पावसाळ्यात रेल्वेकडून ब्लॉक दिला जात नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे सर्व सुटे भाग अंबाला येथील प्रकल्पातून मुंबईत आणण्यात आले आहेत. तुळईचे सगळे भाग आल्यानंतर सुट्या भागांच्या जोडणीचे काम २४ ऑगस्ट रोजी पूर्ण झाले. प्रत्येक तुळईचे माप १.० मीटर रूंदीच्या पदपथासह १३.५ मीटर रूंद (३ अधिक ३ मार्गिका) आणि लांबी ९० मीटर आहे. तुळईचे वजन सुमारे १३०० मेट्रिक टन इतके आहे. तुळईच्या सुट्या भागाची कार्यस्थळावर जुळवणी, तसेच रेल्वे भागावर स्थानापन्न करण्यासाठी प्रकल्पस्थळी उपलब्ध कमी जागा या बाबी लक्षात घेता ३६० अंशामध्ये फिरणाऱ्या अवजड क्रेनचा उपयोग करण्यात आला. हेही वाचा - रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’! पूल सुरू होण्यास पुढील वर्षाची मुदत दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) काम १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे.