धुक्यामुळे रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी पहाटेपासून पसरलेल्या धुक्यामुळे उपनगरीय रेल्वे आणि विमान वाहतुकीबरोबर रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. दाट धुक्यामुळे मोटरमनला लोकल चालविणेही कठीण झाल्याने लोकलचा वेग चांगलाच मंदावला. पश्चिम रेल्वेपेक्षा मध्य रेल्वेवर धुक्याने लोकल वेळापत्रकाचे तीनतेराच वाजले. तर मुंबई विमानतळावर विमान उड्डाण आणि लँडिंगही उशिराने होत होते. सकाळी नऊ  वाजेपर्यंत हीच परिस्थिती होती.

मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणात दाट धुक्याची चादर पसरली होती. गुरुवारी धुक्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पहाटे पाच ते सकाळी नऊ  वाजेपर्यंत लोकल उशिराने धावत होत्या. त्या वेळी लोकल चालवताना मोटरमनना मोठी कसरत करावी लागली. हीच परिस्थिती शनिवारीही पाहायला मिळाली. त्यामुळे मोटरमन आणि लोको पायलटला लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ा चालविणेही कठीण होऊन बसले. मध्य रेल्वेवर गुरुवारी अप दिशेला येणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांना मुलुंडपर्यंत धुक्याचा सामना करावा लागला. शनिवारी मात्र संपूर्ण मध्य रेल्वे मार्गावरच धुके पसरल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. धुक्यामुळे लोकलचा वेग ताशी २० किलोमीटर वेगापर्यंतच ठेवावा लागत असल्याचे एका मोटरमनने सांगितले. परिणामी प्रवाशांना मोठय़ा गर्दीचा सामना करावा लागला. लांब पल्ल्याच्या गाडय़ांनाही पुढे सरकताना मोठी समस्या येत होती. पश्चिम रेल्वेवरील लोकलही १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

मुंबई लोकलबरोबरच मुंबई विमानतळावरून उड्डाण होणारे आणि लँडिंग करणाऱ्या विमान सेवाही विस्कळीत झाल्या. दृश्यमानता कमी झाल्याने विमानांचे उड्डाण उशिराने होत होते. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर बराच वेळ ताटकळत राहावे लागले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fog impact on traffic
First published on: 10-12-2017 at 02:14 IST