लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) द्वारे मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेटचे काम सुरू आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गात वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळ फाट्यापर्यंत २१ किमीचा बोगदा खणण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धत अशा दोन्ही पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. या भुयारी बोगद्याचे काम करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचा प्रवेशबिंदू विक्रोळी येथे आहे. येथील भूखंडावरील १ हजार ८२८ झाडांचे नुकसान होणार आहे. त्यापैकी १ हजार ६८७ झाडे तोडून १४१ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. झाडांची नुकसान भरपाई म्हणून एनएचएसआरसीएसद्वारे ५ हजार ३०० झाडे लावण्यात येणार आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सुरुवातीचे वांद्रे -कुर्ला संकुल हे स्थानक भूमिगत स्वरूपात बांधले जाणार आहे. तसेच, २१ किमी लांबीचा बोगदा तयार केला जाणार असून त्यापैकी ७ किमी लांबीचा बोगदा समुद्राखाली असेल. बोगद्याच्या कामानिमित्त विक्रोळी येथील ३.९२ हेक्टर क्षेत्रातील एकूण १ हजार ८२८ झाडे तोडण्यात येणार आहेत. या झाडांच्या बदल्यात ५,३०० झाडे लावण्याचा निर्णय नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतला आहे.

आणखी वाचा- राज्यातील रुग्णालयांना सज्जतेचे आदेश; दृकश्राव्य माध्यमातून रुग्णालय प्रमुखांची बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३.९२ हेक्टर भूखंडापैकी २ हेक्टरवर ट्रॅक्शन सबस्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार असून, या परिसरातील एकूण झाडांची संख्या १ हजार २४३ इतकी आहे. त्याचप्रमाणे, बांधकाम क्षेत्रात १.९ हेक्टर जागेत बोगद्याच्या कामासाठी आणि वायुविजनासाठी इमारत बांधण्यात येणार असून, या परिसरात एकूण ५८५ झाडे आहेत. ही झाडे तोडण्यात येणार असून यापैकी १४१ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. तसेच, वन विभागामार्फत ५,३०० झाडे लावण्यात येणार आहेत, असे एनएचएसआरसीएल अधिकाऱ्यांनी सांगितले.