विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय मुंबईला न्हावा शेवा बंदरात सिगारेटची तस्करी करणाऱ्या कंटेनरची माहिती मिळाली होती. त्यानुसार या कंटेनरची माहिती घेण्यात आली. त्यावेळी पुढील मंजुरीसाठी कंटेनर अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये उतरवला जाणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. या कंटेनरच्या हालचालींवर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नजर ठेवली होती. कंटेनरने बंदर सोडल्यानंतर, तो ठऱलेल्या ठिकाणी जाण्याऐवजी तो कंटेनर अर्शिया एफटीडब्ल्यूझेडकडे जात असताना एका खाजगी गोदामामध्ये नेण्यात आला. या कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्याने आणि त्यांनी कंटेनर गोदामात अडवला. तपासणीत, संपूर्ण ४० फूट कंटेनर विदेशी मूळ सिगारेटने भरलेले आढळले. या सिगारेटच्या आयातीवर भारतात बंदी आहे. सीमाशुल्क विभागाचा ससेमिरा चुकवण्यासाठी या गोदामात सिगारेट काढून त्यात कागदपत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या वस्तू भरण्यात येणार होत्या. तपासणीत गोदामात कागपत्रांमध्ये घोषित केलेला माल यापूर्वीच भरून ठेवण्यात आला होता.
हेही वाचा >>> वाशी-स्वारगेट शिवनेरी सेवा बंद, प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी महामंडळावर नामुष्की
आयात केलेल्या कंटेनरमधून एस्से, मॉन्ड, डनहिल आणि गुडंग गरम या विदेशी सिगारेटच्या एक कोटी सात लाख सिगारेट सापडल्या. तसेच यापूर्वी तस्करी करून आणण्यात आलेल्या एस्से लाईट, मॉन्ड या १३ लाख विदेशी सिगारेटचा साठाही सापडला. या कारवाईत एकूण एक कोटी २० लाख सिगारेट जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत २४ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी आयातदारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. परदेशी सिगारेटला भारतात मोठी मागणी आहे. पण त्याच्या आयातीवर बंदी असल्यामुळे त्यांची तस्करी केली जाते. टाळेबंदीच्या काळात या सिगारेटच्या मागणीत प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे या सिगारेटच्या तस्करीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली होती. त्या काळात दोन महिन्यात ३० कोटी रुपयांच्या सिगारेट न्हावा शेवा बंदरावरून पकडण्यात आल्या होत्या. पण त्यानंतरही या तस्करीत घट झालेली नाही. मागणी अधिक असल्यामुळे आजही मोठ्याप्रमाणात या सिगारेटची तस्करी केली जाते. विशेष करून दुबईतून मोठ्याप्रमाणात सिगारेटची भारतात तस्करी केली जाते.