राज्यभरात विविध कारणांसाठी होणाऱ्या वीजचोरीला आळा घालण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्याचे सूचनावजा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी वीज वितरक कंपन्या आणि पोलिसांना दिले आहेत.
उत्सवादरम्यान मोठय़ा प्रमाणात वीज चोरी होते. ही वीजचोरी रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने विशेष पथके स्थापन करण्याचे आदेशही दिले होते. मात्र त्या आदेशांची अंमलबजावणीच केली जात नसल्याचा आरोप करीत केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेद्वारे या आदेशांच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने वीजवितरक कंपन्या आणि पोलिसांना वीजचोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन वीजचोरीच्या घटनांना आळा घाळण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्याची सूचनावजा निर्देश दिले आहे. दरम्यान, मराहाष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने (एमएसईडीसीएल) याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना वीजचोरीला आळा घालण्यासाठी ४२ फिरती दक्षता पथके स्थापन केल्याचा दावा केला आहे. या पथकांद्वारे वीजचोरीच्या घटनांवर देखरेख ठेवली जाते. उत्सवाच्या काळात वीजचोरीचे प्रमाण अधिक असल्याने त्या वेळी ही पथके प्रामुख्याने कार्यरत असतात. याशिवाय उत्सव काळातील वीजचोरी रोखण्यासाठी मंडळांना कमी दरात तात्पुरता वीजपुरवठा केला जात असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.