माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे अशी माहिती समोर येते आहे. दुपारी ३.३० वाजता फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या दोघांमध्ये १ तास चर्चा झाली असे समजते आहे. २३ जानेवारीला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. मनसे आपल्या झेंड्याचा रंगही बदलणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरेंनी महाविकास मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना हिंदुत्व विसरली आहे अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज ठाकरेंची मनसे ही जागा भरुन काढू शकते अशीही चर्चा होते आहे. तसंच भाजपालाही हिंदुत्ववादी भूमिका असलेल्या पक्षाची साथ हवीच आहे. दरम्यान या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते आहे.  एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेे हे भाजपासोबत जाऊ शकतात असे संकेत कालच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले होते. त्यानंतर आजच या दोघांची भेट झाल्याची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीही राज ठाकरेंनी मनसेला एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या असं आवाहन केलं होतं. मात्र या निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. अशा सगळ्या स्थितीत मनसेच्याही अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या दोन दिग्गज नेत्यांनी आज भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm devendra fadanvis meet raj thackeray in mumbai today scj
First published on: 07-01-2020 at 19:21 IST