मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावलं होतं. मात्र, अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं आज अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या, मात्र तरीही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. त्यांना अनेकदा समन्स बजावले होते, परंतू ते ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. त्यांचं म्हणणं ते वकिलांच्या मार्फत न्यायालयात मांडत होते. गेल्या पाच महिन्यांपासून विविध तपास यंत्रणा अनिल देशमुखांचा शोध घेत होत्या परंतु त्यांचा कोणताच शोध लागत नव्हता. मात्र आज अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.  

प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया..

कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही. त्यामुळे लपण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल करून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा न मिळाल्याने त्यांनी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा निर्णय घेतला असेल, असंही प्रवीण दरेकर टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former home minister anil deshmukh appeared in the ed office hrc
First published on: 01-11-2021 at 12:08 IST