भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लाला आणि हाजी मस्तान यांना भेटत असत. ही बाब मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे असा दावा हाजी मस्तानचा मानलेला मुलगा सुंदर शेखर याने केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी एका जाहीर मुलाखतीमध्ये इंदिरा गांधी मुंबईत आल्या की करीम लालाची भेट घेत असं वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन बराच वाद निर्माण झाला. त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचं वाक्य मागे घेतलं. आता मात्र हाजी मस्तानच्या मानलेल्या मुलाने म्हणजे सुंदर शेखरने संजय राऊत जे बोलले ते काहीच चुकीचं नाही असं म्हटलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाले सुंदर शेखर?

” हाजी मस्तान आणि करीम लाला यांची भेट इंदिरा गांधी घेत असत. इंदिरा गांधी मुंबईत येणार असतील तर करीम लाला यांना दोन दिवस आधीच समजत असे. मी इंदिरा गांधी यांना करीम लाला आणि हाजी मस्तान यांची भेट घेताना पाहिलं आहे. त्यांच्यात काय चर्चा होत होती ते कधी समजलं नाही. कारण मी तेव्हा लहान होतो. मला लांबून सगळं दिसायचं . या तिघांनाही चर्चा करताना मी पाहिलं आहे. 70 ते 80 च्या दशकातली ही गोष्ट आहे. ”

राष्ट्रपती भवनातला फोटो समोर आला आहे. राष्ट्रपती भवनात करीम लाला यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती ही बाबही खरी आहे. करीम लाला आणि हाजी मस्तान या दोघांसोबतही मी राहिलो आहे. मी ब्राह्मण असूनही या दोघांनी मला सांभाळलं असंही सुंदर शेखर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर इंदिरा गांधी मुंबईत येणार असल्या की करीम लाला यांना समजत असे. मी त्यांच्यासोबत गेलोही होतो तेव्हा मी इंदिराजींना पाहिलं आहे असंही सुंदर शेखर यांनी म्हटलं आहे.

सुंदर शेखर म्हणतात, ” तो काळ असा होता की हाजी मस्तान निघाले की त्यांना पाहण्यासाठी लोक दुतर्फा जमत हेदेखील मी पाहिलं आहे. फक्त इंदिरा गांधीच नाहीत तर अनेक काँग्रेसचे नेते त्यांना भेटत असत. निवडणूक प्रचारातही हाजी मस्तान आणि करीम लाला यांची महत्त्वाची भूमिका होती”