मुंबई : स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापकाने दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी जामीन मंजूर केला.
संस्थेच्या तक्रारीची दखल घेत शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना समन्स बजावत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमय्या मंगळवारी महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले. मात्र त्यांनी आपल्याला आरोप मान्य नसल्याचे सांगितले. तसेच जामिनाची मागणी केली. न्यायालयानेही त्यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी झोपु प्राधिकरण आणि म्हाडा या संस्थांमधून १०० कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश तक्रारदाराला दिले होते, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. शिवाय सोमय्या यांनी १ एप्रिल २०२१ रोजी ‘अर्थ’ या संस्थेचे संस्थापक प्रवीण कलमे यांना गृहनिर्माण विभागाचा ‘सचिन वाझे’ म्हणून संबोधले होते. सोमय्या यांनी आपल्याविरोधात खोटे आरोप करून त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजातील आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे, असा दावा करत कलमे यांनी सोमय्या यांच्याविरोधात शिवडी न्यायालयात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती.