लोकसभा निवडणुकीत झालेल्या  पराभवातून धडा घेत काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी करण्याचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना संघटनेच्या आणि जिल्हा बळकटीच्या कामाला लावण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला असून चार वरिष्ठ मंत्र्यांना मतदारसंघाचा ‘रस्ता’ दाखवण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पराभवाची कारणे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची शुक्रवारी सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा झाली. या बैठकीत राज्य प्रभारी मोहन प्रकाश, सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल उपस्थित होते. पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे, असे सांगत सोनिया यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष बदलण्यास नकार दिला. मात्र, त्याचवेळी मंत्रिमंडळात बदल करण्याच्या सूचनाही सोनिया यांनी दिल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत ज्या मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला पिछाडी मिळाली, त्या मंत्र्यांवर यामध्ये कुऱ्हाड पडू शकते. हा शिक्षेचा भाग नसून या मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत करावे आणि पक्षसंघटनेला बळकटी द्यावी, असा यामागील उद्देश आहे, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात शनिवारी निर्णय होऊ शकतो. या चार जणांना हटवल्यानंतर काँग्रेसकडून आपल्या कोटय़ातील तीन रिक्त जागाही भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सात नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राणे, कदम, राऊत, थोरात?
शुक्रवारी झालेल्या बैठकीत कोणत्या वरिष्ठ मंत्र्यांना हटवायचे याबाबत चर्चा झालेली नाही. मात्र, मंत्रिमंडळाच्या फेरबदलामध्ये नारायण राणे, पतंगराव कदम, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यापैकी चौघांना हटवण्यात येण्याची शक्यता आहे. अर्थात चार मंत्र्यांना हटवायचे की दोन मंत्र्यांना याचा निर्णयही अद्याप झालेला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four congress ministers force to quiet office
First published on: 31-05-2014 at 01:08 IST