आणखी एक मजूर बेपत्ता, शोधमोहीम सुरू; खासगी कंपनीच्या मालकासह तिघांना अटक
गोरेगावच्या ‘टेक्निक प्लस’ या व्यावसायिक इमारतीत रविवारी लागलेल्या आगीत चार मजुरांचा मृत्यू झाला. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आगीला जबाबदार धरत खासगी कंपनीच्या मालकासह तिघांना गोरेगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्य़ात अटक केली.
‘टेक्निक प्लस’ इमारतीत इतिसॅलेट या मोबाइल कंपनीने १० ते १५ वर्षांपूर्वी दोन माळे विकत घेतले होते. तेथे कंपनीचे कार्यालय होते. दिवाळखोरीत निघाल्यानंतर कंपनीच्या मालमत्तांवर जप्ती आली. लिलाव प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेत टेक्निक प्लस इमारतीतील दुमजली कार्यालयाचाही लिलाव करण्यात आला. लिलावात हे कार्यालय घेणाऱ्या कंपनीने आतील सामान बाहेर काढण्याचे कंत्राट प्रणाम एन्टरप्रायझेस कंपनीकडे सोपवले. प्रणामने रमझान खान आणि सलीम मणियार या दोन व्यक्तींकडून कामासाठी मजुरांची तजवीज केली. या दोघांनी साधारण शंभर मजूर पुरवले. खान, मणियार पर्यवेक्षक म्हणून देखरेख ठेवत होते. गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनाजी नलावडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेश व सूचनेनुसार इतिसॅलेट कंपनी कार्यालयातून सामान, यंत्रे, उपकरणे, कागदपत्रे आदी वस्तू बाहेर काढण्याचे काम सुरू होते. जीवित किंवा मालमत्तेची हानी न होता हे काम पूर्ण करा, असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते. मात्र तरीही सुरक्षिततेचे उपाय न योजता प्रणाम कंपनीचे मालक नितीन कोठारी, पर्यवेक्षक व मजूर पुरवठादार सलीम, रमझान या तिघांनी मजुरांचा जीव धोक्यात घातला. त्यामुळे या तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
दरम्यान, रविवारी दुपारी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाला आत मजूर अडकून पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बचावकार्य सुरू करून दलाने नैमुद्दीन शहा, राम अवतार, राम तिरथपाल आणि शमशाद शहा या चार मजुरांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारांपूर्वी या चौघांना मृत घोषित केले गेले. शमशादचा मृतदेह मध्यरात्री तीनच्या सुमारास आढळला. काही मजुरांनी आणखी एक साथीदार अब्दुल खान आत अडकून पडल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार सोमवारीही शोधमोहीम सुरू ठेवली होती. हे सर्व मजूर उत्तर प्रदेश, बिहारचे रहिवासी आहेत.
रविवारी सुट्टीमुळे टेक्निक प्लस इमारतीतील सर्वच कार्यालये बंद होती. आग सोमवारी लागली असती तर कदाचित आम्हीसुद्धा आत अकडून पडलो असतो, अशी भीती सोमवारी इमारतीत आलेल्या कर्मचारीवर्गाने व्यक्त केली.
भाई मुझे माफ करना
भाई मुझे माफ करना.. यहां पे आग लगी हे.. मेरा बचना मुश्कील है, हा अब्दुलचा अखेरचा संवाद. टेक्निक प्लस इमारतीत लागलेल्या आगीनंतर अब्दुलने उमरगा येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या भावाला मोबाइलवर संपर्क साधून असा संवाद साधला. त्यानंतर भावाने मुंबई गाठली. मात्र अब्दुलचा शोध लागलेला नाही. त्यामुळे तो गेला कुठे हे शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबाने केली.
चौकशीचे आदेश
गोरेगाव येथील ‘टेक्निक प्लस’ या व्यावसायिक इमारतीच्या सातव्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश अग्निशमन दलाच्या स्थानिक केंद्रातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवाल येत्या आठवडाभरात सादर करण्याची सूचनाही या अधिकाऱ्यांना करण्यात आल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.