शैलजा तिवले

करोना’ विषाणूशी सुरू असलेल्या लढय़ात डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र एक करून रुग्णांचा जीव वाचवण्यात धडपडत असताना, करोनाच्या भीतीतूनच त्यांना ‘चार हात दूर’ ठेवण्याची वागणूक मिळत असल्याचे आढळून आले आहे. घरमालकांकडून भाडेकरू डॉक्टरना खोली रिकामी करण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त ताजे असतानाच, आता टॅक्सीचालकांकडून डॉक्टरांना प्रवासभाडे नाकारण्यात येत असल्याचे प्रकारही घडत आहेत.

हैदराबाद आणि दिल्लीपाठोपाठ आता मुंबईतही करोनाच्या भीतीने डॉक्टरांना दुजेपणाची वागणूक दिल्याचे निदर्शनास येत आहे. सीएसएमटीजवळील जीटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना घरापासून रुग्णालयात सोडण्यास एका टॅक्सीचालकाने नकार दिला.  ‘संचारबंदीमुळे प्रवास करण्याची अडचण निर्माण झाल्याने घराजवळील टॅक्सीचालकाला रुग्णालयात सोडणे आणि घेऊन येण्यासाठी मी विचारले होते. चार दिवसांपूर्वी त्याने मला रुग्णालयातून घरी सोडले. परंतु काल मी त्याला रुग्णालयात सोडण्यासाठी विचारले तर त्याने चक्क नकार दिला. मी डॉक्टर आहे, रुग्णालयात जातो, त्यामुळे माझ्याशी संपर्क आला तर त्यालाही करोना संसर्ग होईल, या भीतीने त्यांच्या कुटुंबीयांनी न येण्यासाठी दबाव टाकल्याचे समजले. शेवटी मलाच दुसरे मार्ग शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही,’ असे रुग्णालयातील डॉ. तुषार वायखिंडे यांनी सांगितले. आपल्या सहकाऱ्यांनाही समाजाकडून असे अनुभव येत असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येक डॉक्टर हा स्वत:ची काळजी घेत असतो. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत असतो. रुग्णालयात आणि बाहेरही तो तितकीच काळजी घेतो. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. स्वत:ची काळजी घेत असताना त्यांनाही सहकार्य करावे.

– डॉ. अविनाश सुपे, कार्यकारी संचालक, हिंदुजा रुग्णालय.