मुंबईमध्ये मागील दोन महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये सर्वाधिक ‘एच३ एन२’चे रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईमध्ये इन्फ्ल्यूएंझाचे १४१ रुग्ण सापडले असून त्यामध्ये ‘एच१ एन१’चे ११२ तर ‘एच३ एन२’चे २९ रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद मार्चमध्ये झाली आहे. मार्चमध्ये ‘एच३ एन२’चे २१ रुग्ण सापडले असून, जानेवारीत १ आणि फेब्रुवारीत ७ रुग्णांची नोंद झाली. तर ‘एच१ एन १’च्या ११२ रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ५५ रुग्ण मार्चमध्ये सापडले आहेत. आतापर्यंत नोंद झालेल्या रुग्णांपैकी सध्या १४ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात ‘एच३ एन२’चे ९ तर ‘एच१ एन१’च्या पाच रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा >>> आघाडीच्या एकजुटीसाठी काँग्रेसकडून ‘सावरकर’ मुद्दा बाजूला, सभांमधून भाजप-शिंदे गटाला प्रत्युत्तर
रुग्णालये सज्ज
कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयातील प्रयोगशाळेत दररोज २०० नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे. मात्र या रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत नमुने तपासणीचे ४०० संच उपलब्ध केले आहेत. तसेच कस्तुरबा, सायन, केईएम, कूपर आणि नायर रुग्णालयासह १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण खाटांची सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच जीवनरक्षक प्रणालीही सज्ज ठेवली आहे.
हेही वाचा >>> मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारपासून महिनाभर टंचाई; ठाण्यालाही फटका
राज्यात पाच जणांचा मृत्यू
संशयित मृत्यू म्हणून नोंद असलेल्या मृतदेहाच्या मृत्यू परीक्षणाच्या अहवालानंतर मंगळवारी राज्यातील ‘एच३ एन२’च्या मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. वाशिम येथे एका संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे संशयित मृतांची संख्या एक झाली आहे. राज्यात मंगळवारी १५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या ३३३ झाली.
मार्गदर्शक सूचना..
खासगी डॉक्टर तसेच आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांनी तापाचा रुग्ण आल्यास कोणती काळजी घ्यावी याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शिंकताना आणि खोकताना नाकावर रुमाल धरावा, ताप, घसादुखी, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.