पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात मुंबईकरांची धडक मोहीम
मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या खड्डे, रस्ते, आरोग्यसेवा, अनधिकृत बांधकामे या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुंबईकरांकडून ठिकठिकाणच्या पालिका प्रभाग कार्यालयासमोर ‘शर्म करो, कुछ तो काम करो’ ही मोहीम राबवली जाणार आहे. वर्षांनुवर्षे मुंबईकर या समस्यांना सामोरे जात आहेत. नगरसेवकांना कोटींमध्ये निधी मिळूनही रहिवाशांच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांनी पालिकेला जागे करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा वापर केला आहे.
‘फ्री अ बिलियन’ संस्थेच्या पुढाकाराने मुंबईतील ठिकठिकाणच्या पालिका वॉर्ड कार्यालयासमोर ‘शर्म करो, कुछ तो काम करो’ ही मोहीम राबवली जाणार आहे. १८ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित केलेल्या या मोहिमेत विभागीय स्तरावर काम करणाऱ्या नागरिकांच्या समन्वयातून मुंबईत विविध ठिकाणी असलेल्या पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाबाहेर कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे.
पालिकेच्या अनास्थेमुळे आणि कामातील दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जावे आणि या त्रासातून नागरिकांची सुटका व्हावी, हा या मोहिमेमागचा हेतू असल्याचे ‘फ्रीअ बिलियन’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा सुंदरेसन यांनी स्पष्ट केले.
ही मोहीम शांततापूर्ण पद्धतीने करण्यात येणार असून पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांकडे नागरिकांचे निवेदन देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात महापौरांनाही मुंबईकरांच्या समस्येविषयी सजग करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
सामाजिक संस्थांचा पुढाकार
जी उत्तर, एस, एन, के/पूर्व, ई, एफ/ उत्तर, एम/ पूर्व, एम/ पश्चिम, एफ/दक्षिण आणि एल अशा विविध प्रभागांतील नागरिकांचे संघ तसेच स्थानिक सामाजिक संस्था मोहीम राबविण्याकरता पुढे सरसावल्या आहेत. प्रत्येक विभागात तेथील स्थानिक रहिवाशांना पालिकेसंबंधात सर्वाधिक ग्रासणाऱ्या समस्येवर या मोहिमेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कचऱ्याची समस्या, अनधिकृत बांधकामे आणि पार्किंग, फेरीवाले, अस्वच्छता, पादचारी मार्गाची दुरवस्था, रस्त्यांची दुर्दशा, रस्त्यावर दिवे नसणे, शौचालयांची कमतरता तसेच वाईट अवस्था, तुंबलेली गटारे आणि रस्त्यावर वाहणारे नाल्याचे सांडपाणी अशा विविध समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधावे, याकरता ही मोहीम आखण्यात आली असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.