पैशांवरून भागीदारीत दुरावा झाल्याने मित्राचे अपहरण करुन ५० लाख रुपयांची वसूलीचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार कामोठय़ात समोर आला आहे. या प्रकरणी कामोठे पोलीसांनी चौघांना अटक केली आहे.
कामोठे गावातील प्रभुदास गोवारी आणि महेंद्र गोवारी हे दोघे जिवलग मित्र होते. त्यांचा रिअल इस्टेटचा भागीदारीत व्यवसाय होता. यात महेंद्रला प्रभुदास काही रक्कम देणे लागत होता. त्याने ही रक्कम परत न केल्याने महेंदन्रे त्याच्याकडे काम करीत असलेल्या दयानंद ढावरे (३६),राजकुमार चव्हाण (२७), आनंदराव पाटील (३९) यांच्या मदतीने प्रभुदासचे अपहरण करुन त्याला सेक्टर २१ येथील सिध्दीविनायक कॉम्पलेक्स या इमारतीच्या एका सदनिकेत कोंडून ठेवले. धाक दाखवून प्रभुदासकडून एक लाख रुपयांची रोख रक्कम, गळ्यातील सोन्याची साखळी आदी ऐवज हिसकावून घेतला.  त्यानंतर प्रभुदासकडून एका स्टॅम्पपेपरवर ५० लाख रुपये घेतल्याचे महेंद्रने लिहून घेतले. त्यानंतर प्रभुदासची सुटका करण्यात आली.
यानंतर प्रभूदासने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक सचिन जगताप यांच्या पथकाने चौघांना अटक केली.
महेंद्रच्या घरी झडती घेतल्यावर त्यांना गावठी कट्टा सापडला. महेंद्रसहीत पोलीसांनी दयानंद, राजकुमार, आनंदराव यांना ताब्यात घेतले.
चौकट
दयानंद आपली गुन्हेगारी पाश्र्वभूमी सोडून येथे मेहनतीचे जीवन जगायला आला होता. त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. मात्र महेंद्रने या सूपारीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर या तिघांना याकामासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये मिळाल्याने दयानंदचे पाय पुन्हा गुन्ह्य़ाच्या वाटेवर वळले. दयानंदचा नूकताच विवाह ठरला होता. आता दयानंद पोलीस कोठडीत शिक्षा भोगत आहे