मुलुंडमधून यंदा भाजपाने नव्या उमेदवाराला संधी दिली आहे. मिहिर कोटेचा यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मुलुंडमधून तिकीट मिळवण्यासाठी भाजपामध्ये बरीच रस्सीखेच होती. जवळपास सहा जण तिकीटासाठी इच्छुक होते. भाजपाचे सरदार तारा सिंग विद्यमान आमदार आहेत. १९९९ पासून सलग चार वेळा निवडणूक जिंकून ते विधानसभेवर गेले आहेत. वयोमानामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती.

मिहिर कोटेचा मागच्या दोन दशकांपासून भाजपामध्ये सक्रिय आहेत. २०१४ साली त्यांनी वडाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी फक्त ८०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतरही त्यांनी वडाळयामध्ये काम चालू ठेवले. पण तिथले विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोटेचा यांना तिथे संधी मिळण्याची शक्यता नव्हती.

मुलुंडमध्ये मोठया प्रमाणावर गुजराती भाषिक आहेत. त्यामुळे भाजपाचा उमेदवार इथे सहज विजयी होतो. मिहिर कोटेचा हे मूळचे मुंलुंडचे असून ते गुजराती आहेत. त्यामुळे तिकीटासाठी त्यांचे पारडे जड मानले जात होते. माजी खासदार किरीट सोमय्या सुद्धा या मतदारसंघातून पत्नी मेधा सोमय्याच्या तिकीटासाठी प्रयत्न करत होते. वरिष्ठ नेते प्रकाश गंगाधरे हे सुद्धा इथून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तारा सिंग आपला मुलगा रणजित सिंगसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मुलुंडचा विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो.