scorecardresearch

रेल्वे आणि राज्य सरकारकडून एमयूटीपीच्या प्रकल्पासाठी एकूण २५६० कोटी रुपये निधीची गरज, केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लक्ष

आगामी वर्षाच्या अर्थसकल्पात आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून यातील ५० टक्के रक्कम राज्य सरकारकडून मिळणे अपेक्षित असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

MUTP project mumbai
एमयूटीपीच्या प्रकल्पासाठी एकूण २५६० कोटी रुपये निधीची गरज (प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र)

मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर एमयूटीपी २, ३ व एमयूटीपी ३ ए अंतर्गत सुरू असलेले विविध प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) एकूण दोन हजार ६५० कोटी रुपयांची गरज आहे. आगामी वर्षाच्या अर्थसकल्पात आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून यातील ५० टक्के रक्कम राज्य सरकारकडून मिळणे अपेक्षित असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लाखो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

एमआरव्हीसी एमयूटीपीअंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर विविध रेल्वे प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करण्यात येतो. एमआरव्हीसीच्या एमयूटीपी ३ अंतर्गंत विरार – डहाणू चौपदरीकरण, पनवेल – कर्जत दुहेरी मार्गिका, ऐरोली – कळवा उन्नत लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल, प्रवासी रूळ ओलांडून जाऊ नयेत म्हणून उपाययोजना आदी प्रकल्पांचा समावेश आहे. ऐरोली – कळवा लिंक रोडचे काम सुरू असून दिघा स्थानकाच्या कामालाही गती देण्यात आली आहे. विरार – डहाणू चौपदरीकरणही प्रगतीपथावर आहे. इतर प्रकल्पांच्या भूसंपादनासह अन्य कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांसाठी अंदाजित १० हजार ९४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून डिसेंबर २०१६ मध्ये एमयूटीपी ३ ला मंजुरी मिळाली.

हेही वाचा – परिवर्तन संस्थेच्या नाटकाची काला घोडा महोत्सवासाठी निवड

एमयूटीपी ३ ए प्रकल्पांसाठी एकूण ३३ हजार ६९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून गाेरेगावपर्यंत असलेल्या हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार, बोरिवली – विरार पाचवा, सहावा मार्ग, कल्याण – आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण – बदलापूर तिसरी – चौथी मार्गिका, १९१ वातानुकूलित लोकल, सीएसएमटी – पनवेल, सीएसएमटी – कल्याण, चर्चगेट – विरार या मार्गांवर अत्याधुनिक सीबीटीसी यंत्रणा इत्यादी प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. तर एमयूटीपी २ अंतर्गत काही तांत्रिक कामांसाठीही निधीची मागणी करण्यात आली आहे. एमयूटीपी ३ ए मधील वातानुकूलित लोकल, सीबीटीसी, हार्बर विस्तार या प्रकल्पांना गती देण्यात येत आहे.

एमयूटीपीमधील विविध प्रकल्पाच्या कामांसाठी एकूण दोन हजार ६५० कोटी रुपये मिळावे यासाठी रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जेवढ्या निधीला मंजुरी मिळणार त्यापैकी ५० टक्के निधी राज्य सरकारकडून मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – मुंबईतील तापमानात किंचित घट, दोन दिवसात दोन अंशाने पाऱ्यात घसरण

………

मागील अर्थसंकल्पात कमी निधी

१ फेब्रुवारी २०२२ रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात एमयूटीपीतील प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाकडून २०२१ च्या तुलनेत ७५ कोटी रुपये कमी निधी उपलब्ध करण्यात आला होता. रेल्वे मंत्रालयाकडून २०२१ – २०२२ मध्ये ५७५ कोटी रुपये मिळाले होते. तर तत्पूर्वीच्या आर्थिक वर्षात ६५० कोटी रुपये मिळाले होते. यावेळी रेल्वे मंत्रालयाकडून दोन हजार ६५० कोटी रुपयांपैकी एक हजार ३२५ कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.

पुढील प्रकल्पांसाठीही तरतूद होण्याची शक्यता

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
  • मुंबई-दिल्ली मार्गावर प्रतितास १६० किलोमीटर वेगाने गाड्या धावण्यासाठी योजना
  • कल्याण-कसारा तिसरा मार्ग
  • सीएसएमटी-कुर्ला पाचवा-सहावा मार्ग
  • मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावा मार्ग
  • सरकते जीने, पादचारी पूल, स्थानकात एकात्मिक सुरक्षा प्रणाली

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 14:56 IST