मुंबई : अकरावी प्रवेश संकेतस्थळाला लागलेले तांत्रिक अडचणीचे ग्रहण पाचव्या दिवशी काही अंशी कमी झाले. संकेतस्थळ धीम्या गतीने चालणे, लॉगिन आयडी व पासवर्डचे संदेश न येणे, अनेक प्रयत्नांनंतर संदेश आल्यावर ते अन्य कोणी लॉगिन केल्याचे दाखविणे, तसेच अर्जाचा दुसरा भाग सुरूच न होणे अशा अनेक समस्यांनी चार दिवस त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील मदत कक्षामध्येही गर्दी ओसरल्याची दिसून आले.
अकरावी प्रवेश प्रक्रिया २१ मे रोजी सुरू झाली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ सुरूच झाले नाही. तांत्रिक बिघाड दुरुस्त करून २६ मेपासून नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणीचे ग्रहण कायम होते. संकेतस्थळावर २६ मे रोजी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र दिवसेंदिवस त्यामध्ये अधिकच भर पडत होती. विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करताना लॉगिन आयडी व पासवर्ड न मिळणे, लॉगिन आयडी व पासवर्ड मिळाल्यास ते अन्यत्र सुरू असल्याचे दाखविणे, शुल्क भरता न येणे, अर्जचा दुसरा भाग भरता न येणे, पसंतीक्रम भरताना महाविद्यालयांची यादी न दिसणे अशा समस्या दिवसेंदिवस वाढतच होत्या.
विद्यार्थी व पालकांना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ते हताश झाले होते. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षामध्ये दररोज ४० ते ५० विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नोंद केली जात हाेती. या तक्रारी दररोज शिक्षण संचालक कार्यालयाला पाठविण्यात येत होत्या. अखेर शुक्रवारी सकाळपासून संकेतस्थळ काही अंशी व्यवस्थित सुरू असल्याचे निदर्शनास आले.
मदत कक्षाला अधिकार
संकेतस्थळावर अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थी व पालक विभागीय शिक्षण संचालकांच्या कार्यालयातील मदत कक्षाला भेट देत होते. मात्र त्यांच्याकडे संकेतस्थळ वापराबाबतचे कोणतेही अधिकार नसल्याने ते फक्त विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नोंद घेत होते. मात्र शुक्रवारी मदत कक्षाला विद्यार्थ्यांचा लॉगिन आयडी व पासवर्डसंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबतचे अधिकार देण्यात आले. त्यामुळे लॉगिन आयडी व पासवर्डसंदर्भात तक्रार घेऊन येणाऱ्या विद्यार्थी व पालकांची समस्या तातडीने सोडविण्यात येत होती. तसेच पहिल्या चार दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या कमी तक्रारी आल्याचे मदत कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले.