मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून उत्सवाला पर्यावरण रक्षणाच्या उद्दिष्टाची जोड देत आणि सामाजिक बांधिलकी जपत मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवाच्या धामधुमीत मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे. कागदी लगदा, शाडू माती, बांबू आदी विविध वस्तूंपासून साकारण्यात आलेल्या गणेशमूर्ती लक्षवेधी ठरत आहेत.
दरवर्षी भायखळ्यातील मकबा चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याला प्राधान्य देते. यंदा कागदी लगदा आणि बांबूपासून ७ फुटांची गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. सर्वप्रथम मूर्तिकार गणेश चव्हाण यांनी कागदी मूर्ती घडविली. त्यानंतर रघुनाथसिंग ठाकूर आणि सहकाऱ्यांनी बांबू तासून गणेशमूर्तीवर बांबूचे हिरवे आवरण लावले आहे.
यासाठी १८ फुटांच्या बांबूंचा वापर करण्यात आला आहे. ही गणेशमूर्ती जवळपास १५ दिवसांत घडविण्यात आली आहे. यंदा मकबा चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ६० वे वर्ष असून चाळीतील लहान मुले व युवक गणेशमूर्ती साकारण्यास तसेच सजावट करण्यास मदत करतात. ‘आजवर मकबा चाळीत कापड, कडधान्ये, उपवासाच्या खाद्यपदार्थाचे साहित्य, पेन्सिल, माचिसच्या काड्या, भुईमुगाच्या शेंगा आदी नानाविध वस्तूंचा वापर करून गणेशमूर्ती घडविण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे सुरूवातीला संबंधित वस्तूंचा वापर करून १ फुटाची गणेशमूर्ती घडविण्यात येते आणि त्याचे परिणाम पाहिले जातात. हे परिणाम पाहून वस्तूंमध्ये बदलही केला जातो. त्यानंतरच मुख्य गणेशमूर्ती साकारण्यास सुरूवात होते’, असे मंडळाचे सचिव रघुनाथसिंग ठाकूर यांनी सांगितले.

विलेपार्ले येथील बाळ गोपाळ मित्र मंडळ (मुंबईचा पेशवा) २००८ पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत असून कागदी मूर्ती साकारत आहे. १९८९ साली स्थापन झालेले हे मंडळ यंदा ३७ वे वर्ष साजरा करीत आहे. यंदा बाळ गोपाळ मित्र मंडळाने टिश्यू पेपर आणि तांदळाच्या टरफलापासून २४ फुटांची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती मंडळाचे सदस्य व मूर्तिकार दिगंबर व राजेश मयेकर यांनी घडविली असून युवा मंडळींनी सहकार्य केले आहे.
विशेष बाब म्हणजे ही मूर्ती फिरती असून आगमन व विसर्जन मार्गावर अडथळे येत नाहीत. ‘आम्ही माघी गणेशोत्सवापासून मूर्ती व सजावट संकल्पनेवर चर्चा करतो. आजवर कागदाचा लगदा, तुरटी, निर्माल्य, केळीचा बुंदा आदी विविध वस्तूंपासून मूर्ती साकारली आहे. तसेच यंदा ‘वसुधैव कुटुंबकम’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित सजावट व चलचित्र साकारण्यात आले आहे.
सध्याच्या काळातील कौटुंबिक संघर्ष व मोबाईलच्या अतिवापराने होणारे दुष्परिणामावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यासाठी मंडळातील ५० ते ६० युवा मंडळींनी मेहनत घेतली असून मराठी संहिताही त्यांनीच लिहिली आहे. विशेष बाब म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित मूर्तीची रचनाही करण्यात आली आहे’, असे मंडळाचे विश्वस्त विजय नायकुडे यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आणि ‘गिरगावचा राजा’ अशी ख्याती असणाऱ्या गिरगावमधील निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे यंदा ९८ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तिकार राजन पाटकर यांनी शाडू मातीपासून भव्य २२ फुटांची मूर्ती साकारली आहे. यासाठी शाडू मातीसह गवत आणि टोपल्यांचाही वापर करण्यात आला आहे.
८ हजार किलो शाडू मातीपासून घडला ‘गिरगावचा महाराजा’
‘गिरगावचा महाराजा’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अखिल मुगभाट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे ९४ वे वर्ष आहे. मूर्तिकार राजन वेदक यांनी तब्बल ८ हजार किलो शाडू मातीचा वापर करून २४ फुटांची भगवान जगन्नाथाच्या रूपातील गणेशमूर्ती साकारली आहे. यासाठी तब्बल १८० गोणी माती (८ हजार किलो), गवत, पेंढ्या, टोपल्यांचा वापर करून १ महिन्यात मूर्ती साकारली आहे.
यासाठी मूर्तिकार राजन वेदक यांच्यासह १० ते १२ कलाकार काम करीत होते. ‘आम्ही १९३२ पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत आहोत. विसर्जनादरम्यान गणेशमूर्तीची विटंबना होऊ नये आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनासंदर्भात जनजागृती होणे, ही दोन मुख्य उद्दिष्ट्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यामागे असतात. तसेच यंदा भगवान जगन्नाथाच्या रूपातील गणेशमूर्तीच्या अनुषंगाने सजावट करण्यात आली असून रथाचे स्वरूप देण्यात आले आहे’, अशी माहिती ‘गिरगावचा महाराजा’ मंडळाचे अध्यक्ष निलेश (बाळा) अहिरेकर यांनी सांगितले.