नियमावली जाहीर होण्यापूर्वीच तयारी सुरू झाल्याने अंमलबजावणीत अडचणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई  : माघी गणेशोत्सवाला साधेपणाने साजरा करण्याबाबतची नियमावली मुंबई महापालिकेने जाहीर केल्याने मंडळांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. अनेक मंडळांनी नियमावली जाहीर होण्यापूर्वीच गणेशोत्सवाची तयारी केली आहे. त्यामुळे  यंदाच्या माघी गणेशोत्सवात पालिकेच्या नियमांचे पालन होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक मंडळांनी देखावे साकारले असून उंच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर आगमन विसर्जन सोहळय़ांचे नियोजनही केले आहे. 

मुंबईत जवळपास अडीच हजारांहून अधिक माघी गणेशोत्सव मंडळांच्या नोंदी झाल्या असून यंदा बहुतांशी मंडळांनी उत्सवासाठी कंबर कसली आहे. सार्वजनिक उत्सवाची तयारी महिनाभर आधी सुरू होत असल्याने आता शेवटच्या काही गोंष्टींची पूर्तता करण्यामध्ये मंडळे व्यग्र आहेत. असे असताना १८ जानेवारीला पालिकेने नियमावली जाहीर केली. काही मंडळांपर्यंत ती अद्याप पोहोचलेलीही नाही. या नियमावलीत गेल्या दोन वर्षांपूर्वी घातलेले निर्बंध कायम ठेवले आहेत. चार फुटांपर्यंत गणेशमूर्ती, लहान आकाराचा मंडप, सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी, आगमन- विसर्जन मिरवणुकांवर बंदी, यासह साधेपणाने उत्सव साजरा करावा असे पालिकेचे म्हणणे आहे. ‘आम्ही योग्य ती काळजी घेऊनच उत्सव करणार आहोत. पंधरा दिवसांत मूर्ती घडणे शक्य नसल्याने पालिकेने नियमावली जाहीर करण्याआधीच आमची उंच गणेशमूर्ती तयार झाली आहे. गेल्या दोन वर्षांत आगमन आणि विसर्जन सोहळाही रद्द केला गेला. परंतु यंदा धूमधडाक्यात मिरवणूक काढून गणेश आगमन होईल. या मिरवणुकीत गर्दी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ,’ असे एका मंडळांच्या पदाधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवरून सांगितले.

‘पीओपी’च्या मूर्ती

प्लास्टर ऑफ पॅरिसवरील (पीओपी) बंदीसंदभार्तत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे माघी गणेशोत्सवात सर्रास पीओपीच्या मूर्ती घडवण्यात आल्या आहेत. यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचा समावेश आहे. शिवाय पालिकेला नियमावली जाहीर करण्यास विलंब झाल्याने अनेक मंडळांनी पाच ते सात फुटांच्या गणेशमूर्ती, तर काही मोठय़ा मंडळांनी १० फुटांहून अधिक उंच गणेशमूर्ती साकारून घेतल्या आहेत.

मंडळांकडून कायमच पालिकेला सहकार्य करण्यात येत आहे.  काही मंडळांनी मोठय़ा मूर्ती घडवल्या असतील तर पालिकेने त्यांच्यावर कारवाई करू नये.  नियमावलीबाबत पालिकेने केलेला विलंबही कारणीभूत आहे. 

– नरेश दहीबावकर, अध्यक्ष,  बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav mandals upset rules ganeshotsav ysh
First published on: 22-01-2022 at 00:02 IST