लोकलची धडक लागून ट्रॅकमनचा मृत्यू

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करणारी मध्य रेल्वे आपल्याच कामगारांच्या जीवाबाबत किती हलगर्जीपणा करते, याचा दाखला सोमवारी मिळाला.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करणारी मध्य रेल्वे आपल्याच कामगारांच्या जीवाबाबत किती हलगर्जीपणा करते, याचा दाखला सोमवारी मिळाला. लोकलची धडक लागल्याने ठाणे-मुलुंड या स्थानकांदरम्यान काम करणाऱ्या एका गँगमनचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांत अशा घटना सातत्याने घडत आहेत, मात्र प्रशासनाने अद्याप या कामगारांच्या सुरक्षेसाठी काहीच केलेले नाही. सोमवारच्या घटनेनंतर मात्र संतप्त गँगमननी ठाणे स्थानकात तब्बल २० मिनिटे रेल रोको केला. गँगमन माधवस्वामी कांबळी (५४) हे ठाणे आणि मुलुंड या दरम्यान मुंबईकडे येणाऱ्या धिम्या मार्गावर काम करत होते. दुपारी २.१०च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या एका लोकलची धडक लागून माधवस्वामी जखमी झाले. त्यांना तातडीने ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. गेल्या काही महिन्यांत रेल्वे रूळांवर झालेल्या अपघातात सातत्याने गँगमनचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांची भेट घेऊन याबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत सांगितले होते.मात्र, तरीही सोमवारी हा प्रकार घडल्याने संतप्त झालेल्या गँगमन व रेल्वे कामगारांनी ठाणे स्थानकात रेल्वे रोको केला. ३.२० ते ३.४० या काळात झालेल्या या रेल्वे रोकोदरम्यान कामगारांनी आसनगाव लोकल ठाणे स्थानकातच अडवून ठेवली. अखेर मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक संजीव देशपांडे यांनी या कामगारांची समजूत काढली आणि मार्ग मोकळा केला. याबाबत लवकरच चौकशी केली जाईल. गँगमन हा रेल्वे परिवारातीलच घटक असल्याने असे अपघात होऊ नयेत, याकडे आम्ही लक्ष देऊ, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले.

कमी संख्येमुळे घात
रेल्वेमार्गावरील धोकादायक कामे करण्यासाठी असलेल्या गँगमनच्या एका गँगमध्ये पूर्वी ५०-६० लोक असायचे. त्यामुळे कामाच्या ठिकाणापासून दोन्ही बाजूंना ६०० आणि १२०० मीटर अंतरावर एक एक गँगमन उभा राहून येणाऱ्या गाडय़ांबाबत शिटी वाजवून सूचना देत असे. मात्र सध्या कामगारांच्या कमतरतेमुळे गँगमनची संख्या २०-२५ एवढीच असते. रेल्वेने तातडीने भरती करावी, अशी मागणी आम्ही वारंवार करूनही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे, ‘एनआरएमयू’चे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले. एकही गँगमन रेल्वे रूळांवर काम करताना अपघातात मेला, तर आम्ही रेल्वेसेवा बंद करू, असेही सांगून झाले. मात्र प्रशासनाला त्याचे काहीच सोयरसुतक नाही, असे ते म्हणाले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून आम्ही आतापर्यंत फक्त इशारेच देत होतो. या प्रकाराने गँगमनच्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्यानेच घडल्याचे नायर यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gangnan died in mumbai by hitting local train