अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने आपल्या मालकीच्या हिंदू स्मशानभूमींमध्ये टप्प्याटप्प्याने गॅसवर आधारित दाहिन्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी स्मशानभूमीमध्ये शवदहनासाठी लागणाऱ्या गॅससाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
एका पार्थिवाच्या दहनासाठी ३०० किलो लाकडाची गरज असते, हे लक्षात घेतल्यास पालिकेच्या स्मशानभूमीत दहनासाठी १,८९० रुपये, तर खासगी स्मशानभूमीत २,०१० रुपये खर्च येतो. हा खर्च महापालिका करते. तसेच विद्युतदाहिनीवर शवदहनास ७०० रुपये, तर पीएनजी गॅसवर आधारित दाहिनीमध्ये पार्थिव दहनास ६३० रुपये खर्च येतो. लाकडांद्वारे दहनामुळे जास्त खर्च तसेच पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेने गॅसदाहिन्यांचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महानगर गॅसचे जाळे असलेल्या १०० मीटरच्या परिसरातील नऊ, तर १०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील ११ स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिन्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये ३५ खासगी स्मशानभूमी असून शवदहनासाठी लागणाऱ्या गॅसच्या खार्चापोटी घाटकोपर (पू.) येथील स्मशानभमूमीसाठी ३.५० लाख रुपये, मुलुंड (प.) येथील डी. डी. यू. मार्गावरील स्मशानभूमीसाठी ७ लाख रुपये व मलबार हिल येथील बाणगंगा स्मशानभूमीसाठी ३.५० लाख रुपयांची तरतूद २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. भविष्यात उर्वरित खासगी स्मशानभूमीत गॅसदाहिनी कार्यान्वित झाल्यास गॅस इंधनासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर पडेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.