उग्र वास आणि वाहतूक कोंडीमुळे माहुलगावातील रहिवाशांना मनस्ताप

बुचर आयलंडवरील तेलटाक्यांना लागलेल्या आगीची घटना ताजी असताना सोमवारी सकाळी चेंबूरमधील भारत पेट्रोलियम या कंपनीत मोठी गॅसगळती झाली. येथील कर्मचाऱ्यांच्या तात्काळ ही बाब लक्षात आल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने आठ तासांनंतर ही गॅसगळती थांबविण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र गॅसचा वास आणि वाहतूक कोंडीमुळे रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

चेंबूरच्या माहुल गाव परिसरात अनेक तेल आणि गॅस कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून विविध राज्यांत मालाची निर्यात केली जाते. त्यानुसार सोमवारी सकाळी एका टँकरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना पाइपलाइनचा वॉल अचानक तुटला. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गॅसगळती सुरू झाली. कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार काही मिनिटांतच आरसीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र गॅसगळती मोठी असल्याने या परिसरातील सर्व वाहतूक चार तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात सर्वच ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली. सकाळी शालेय विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच गॅसचा वासदेखील येथील रहिवाशी परिसरात पसरल्याने अनेकांना या वेळी श्वास घेताना अनेकांना त्रास सहन करावा लागला. दुपारी १२च्या सुमारास या गॅसगळतीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

मोनोही थांबवली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गळतीनंतर अनेक प्रवाशांनी मोनो स्थानकांवर धाव घेतली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोनो रेल काही काळासाठी थांबविण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर ताटकळत उभे राहावे लागले.