मुंबई: मुंबईत रुग्णसंख्या वाढण्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने लवकरात लवकर जनुकीय चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पुरेशा नमुन्याअभावी या चाचण्या रखडलेल्या आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा जवळपास १५० च्याही पुढे गेला आहे. परिणामी, बाधितांचे प्रमाण दोन टक्क्यांवर गेले आहे. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमागे जनुकीय बदलाचा काही परिणाम आहे का हे पडताळण्यासाठी पालिका या आठवडय़ात जनुकीय चाचण्या करणार होती. परंतु कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेतील जनुकीय प्रयोगशाळेला आवश्यक नमुने प्राप्त न झाल्यामुळे या चाचण्या झालेल्या नाहीत.

मुंबईत दरदिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्यांमधील सर्व बाधितांचे नमुने कस्तुरबा प्रयोगशाळेला पाठविले जातात. यातील ज्या बाधितांमध्ये विषाणूंचे प्रमाण अधिक आहे असे नमुने जनुकीय चाचण्यांसाठी घेतले जातात. परंतु बाधितांचे हे नमुने येण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून कमी झाले आहे. त्यामुळे जनुकीय चाचण्यांसाठी पुरेसे नमुनेही उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.

  प्रयोगशाळांना सर्व बाधितांचे नमुने पाठविण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यानुसार लवकरच जास्तीत जास्त नमुने कस्तुरबामध्ये पाठविले जातील याकडेही लक्ष दिले जाईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

पालिकेने एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ामध्ये अकराव्या जनुकीय चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले होते. यामध्ये एका रुग्णाला एक्सईची बाधा झाल्याचे आढळले होते, तर जवळपास ९९ टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळले होते.

सांडपाणी नमुने तपासणी प्रलंबित

सांडपाण्याचे नमुने गोळा करण्याची प्रक्रियाच अद्याप पूर्ण न झाल्यामुळे यांच्या जनुकीय चाचण्या करण्याचा प्रकल्प प्रलंबित आहे. सांडपाण्याचे काही नमुने पालिकेने गोळा केले होते. परंतु त्या वेळी शहरातील बाधितांचे प्रमाण कमी असल्यामुळे यातील बाधित नमुन्यांची संख्याही कमी आढळली होती. जास्तीत जास्त नमुने गोळा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून यासाठी आयसीएमआरची मदत घेतली जाणार आहे.

आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच आयसीएमआर मार्फत नमुने घेतले जातील आणि पालिकेले दिले जातील. पुरेसे नमुने प्राप्त झाल्यावर याच्या जनुकीय चाचण्या करण्यात येतील.

–  डॉ.मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gene in covid test stalled due to lack of adequate samples zws
First published on: 11-05-2022 at 02:31 IST