पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ‘ऑनलाइन’ निकालात तांत्रिक घोळामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे की नाही याचा तपशीलच पाहता येत नसल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’तर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांचा आसन क्रमांक, नाव, शहर आदी तपशील भरल्यानंतर त्यांचा निकाल पाहता येतो. यात त्यांनी विषयवार मिळविलेल्या गुणांची माहिती देण्यात आली आहे. परंतु, गुणवत्ता यादीतील क्रमांकाचा निकालावर उल्लेख नसल्याने नेमकी शिष्यवृत्ती मिळाली आहे की नाही, हे कळत नसल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
गुरुवारी निकाल जाहीर झाला त्या दिवशी निकालावर गुणवत्ता क्रमांक दिसत होता. पण, आज तो दिसत नाही, अशी प्रतिक्रिया भांडुपच्या अमरकोर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वागळे यांनी दिली. या तांत्रिक घोळाबाबत परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या प्रकाराबाबत आपण अनभिज्ञ आहोत, असे सांगितले.