दोन दिवसांत हवाई गुप्तचर विभागाने दोन कोटींहून अधिक किमतीचे सोने पकडले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून रविवारी रात्री आलेल्या एका प्रवाशाकडे जवळपास ४४ लाखांचे सोने आढळून आले. दुबई येथून आलेल्या या प्रवाशाकडे हे सोने आढळले असून त्याने त्याच्याकडील सामानात ठेवलेल्या मायक्रोवेव्ह ओवन आणि मिक्सरमध्ये लपवून आणले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसांत प्रवाशांनी अवैधरीत्या आणलेल्या सोन्याच्या सहा घटना उघडकीस आल्या आहेत. यात सापडलेले सोने हे ८.२६ किलो वजनाचे असून त्याची किंमत तब्बल २ कोटी २९ लाख ३१ हजार ८३८ इतकी आहे, अशी माहिती हवाई गुप्तचर विभागाने दिली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या काही दिवसात आखाती देशांतून विशेषत: दुबई येथून अवैधरीत्या सोने आणण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. रविवारी रात्रीदेखील भारतीय पासपोर्ट असलेल्या अब्दुस्सलीम मोहम्मद पल्लिकल या प्रवाशाच्या सामानात सुरक्षा यंत्रणांना सोने आढळून आले. पल्लिकल दुबई येथून एअर इंडियाच्या एआय – ९८४ या विमानाने मुंबई येथे आला होता. त्याची व सामानाची तपासणी केली असता त्यात प्रत्येकी १० तोळे वजनाच्या १३ सोन्याच्या विटा आणि दोन तुटलेल्या विटा आढळून आल्या. या सोन्याचे वजन १६२४ ग्रॅम इतके असून त्याची किंमत ४३ लाख ९८ हजार ९६१ इतकी आहे. पल्लिकल याने हे सोने सुरक्षा यंत्रणांना कळून येऊ नये म्हणून सामानातील इलेक्ट्रिक मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आणि मिक्सर ग्राइंडरच्या कॉइलमध्ये शिताफीने लपवले होते. सीमाशुल्क न भरता भारतीय बाजारात विकण्यासाठी हे सोने आणल्याचे पल्लिकल याने चौकशीदरम्यान कबूल केले. तसेच, दुबई येथील झुल्फिकार या व्यक्तीने हे सोने आपणास दिले असून ते मुंबईत एका अज्ञात व्यक्तीच्या हाती सोपवणार असल्याचेही त्याने सांगितले. पल्लिकल याला अटक करण्यात आली असून त्याची पुढे चौकशी सुरू असल्याचे हवाई गुप्तचर विभागाने स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांत अशा सहा घटना घडल्या असून त्यातून २ कोटी २९ लाख ३१ हजार ८३८ रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold seal on mumbai airport
First published on: 24-01-2017 at 02:59 IST